अजिंक्य शेंडे यांची युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी चौथ्यांदा निवड
युवा सेनेत जल्लोषाचे वातावरण
सुरेन्द्र इखारे वणी : – महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांची नावे जाहीर केली आहे. त्यामध्ये युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते अजिंक्य शेंडे यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निष्ठावान कार्यप्रणालीची ही पावती असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडून आपल्या कार्यशैलीचा परिचय दिला. एका हाकेवर जनतेच्या समस्यांना घेऊन प्रशासनाला जाब विचारणारे कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून शहरात अजिंक्य शेंडे यांनी ओळख निर्माण केली आहे. तडफदार युवा शिवसैनिक म्हणून त्यांचं सामाजिक व राजकीय कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची पदोन्नती करून त्यांच्या पक्षाप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेची खऱ्या अर्थाने कदर केली आहे. त्यांना सामाजिक व राजकीय कार्य करतांना व सार्वजनिक विषय हाताळतांना राजकीय बळ मिळावं, हे त्यांच्या पदोन्नतीमागचं कारण असल्याची चर्चा आहे.
त्यांची सलग चौथ्यांदा निवड झाल्याने युवा सेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.