रघुवंशम् प्रथम सर्ग प्रकाशित.
भारतीय संस्कृतीचा अनमोल साठा रघुवंशम् या ग्रंथाचे लाभ घेण्याचे आवाहन
सुरेन्द्र इखारे वणी :- भारतीय संस्कृतीचा जीवनादर्श असणाऱ्या भगवान श्रीरामचंद्रांच्या अनुपमेय वंशाचे कविकुलगुरू कालिदासांनी केलेले अलौकिक प्रतिभासंपन्न, मनोहारी वर्णन म्हणजे रघुवंशम् महाकाव्य.
रघुवंशम् महाकाव्याचा प्रत्येक श्लोक म्हणजे एक अवर्णनीय रसास्वादाची पर्वणी. मात्र ते श्लोक संस्कृत मध्ये असल्याने त्यांचा सामान्य अर्थ आणि पुढे जाऊन त्यातील ध्वन्यार्थ समजून घेणे ही सामान्य रसिकांच्या साठी दुर्लभ गोष्ट. तथापि आता यासाठी उपलब्ध झालेली सुंदरतम सुविधा म्हणजे लोकमान्य टिळक महाविद्यालय विद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारत असलेली अतिभव्य महत्त्वाकांक्षी लेखमालिका रघुवंशम् .
या महाकाव्याच्या १४८६ श्लोकांवर प्रत्येकी एक या स्वरूपात अमरावती येथील दैनिक हिंदुस्थान मध्ये प्रकाशित होणारी ही लेखमालिका तब्बल साडेचार वर्ष चालत राहणार आहे यावरूनच या विषयाच्या व्यापकतेचा आपणास अंदाज येईल.
वसंत पंचमीच्या पावन पर्वावर दि. १७ डिसेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या या लेखमालेतील पहिल्या सर्गाच्या लेखांचे संकलन ” रघुवंशम् प्रथमसर्ग ” स्वरूपात प्रकाशित झाले आहे. अशा स्वरूपात १९ सर्गांवर १९ ग्रंथ प्रकाशित होतील हे विशेष उल्लेखनीय.
गीर्वाण वाणी या सामाजिक माध्यमातून हजारो लोकांनी गौरविलेली ही लेखमालिका अविरत प्रकाशन जळगाव ( ९०२८८ ६८९५३) यांच्याद्वारे ग्रंथ स्वरूपात उपलब्ध होत आहे.
भारतीय संस्कृतीचा अनमोल साठा रघुवंशम् च्या या निरूपणाचा संस्कृत आणि संस्कृती प्रेमी जणांनी अधिकाधिक संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन अविरत प्रकाशनाच्या द्वारे करण्यात येत आहे.