मतदारांनी मतदान करावे यासाठी वणीत मतदार जनजागृती सायकल रॅली
निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती
सुरेन्द्र इखारे वणी:-
चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाचे सार्वत्रिक निवडणूक दि. 19 एप्रिलला होत आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे
यासाठी वणी येथील शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे व तहसीलदार निखिल धुळधर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करून दिली.
मतदार जनजागृती रॅलीची सुरुवात होण्यापूर्वी रॅलीचा उद्देश सांगण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नितीनकुमार हिंगोले, गणेश किंद्रे, निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, नायब तहसीलदार विवेक पांडे, रोटरीचे निकेत गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व तहसीलदार निखिल धुळधर यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित करून या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रत्येकांनी वैयक्तिक रित्या परिश्रम घेणे ही आजची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी मतदान केलच पाहिजे यासाठी ही जनजागृती रॅली काढत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी केले.
त्यानंतर वणी शहरातील सर्व माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयातील सायकल धारी विद्यार्थ्यांची रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरून पुन्हा येथील शासकीय मैदानावर विसर्जित झाली.