ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेसाठी निघालेल्या मंडल यात्रेचे ३ व ४ ऑगस्टला वणी व मारेगाव तालुक्यात आगमन.
सुरेंद्र इखारे वणी:– नागपूरवरून ७ ऑगस्ट या मंडल दिनाच्या निमित्याने ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जनजागृती अभियानांतर्गत विदर्भातील सात जिल्ह्यात दिनांक ३ ते ७ ऑगस्ट २०२४ ह्या कालावधीत मंडल यात्रा निघालेली आहे. मंडल यात्रेच्या निमित्याने आपल्या देशातील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठ्यांचे सरसकट ओबीसीकरण करू नये, महाज्योती संस्थेस एक हजार कोटीचा निधी द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी भवन निर्माण करावे, नोकर भरतीतील कंत्राटीकरण व खाजगीकरण बंद करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना सर्व व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता १००% शिष्यवृत्ती द्यावी आणि ओबीसींचा एक लाख नोकऱ्यांच्या बॅकलॉग तात्काळ भरावा.या प्रमुख मागण्या मंडल यात्रेच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात येणार आहेत.
मंडल यात्रेच्या आगमनानिमित्य वणी तालुक्यातील सावर्ला, वांजरी, मजरा, नांदेपेरा, मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा, मार्डी, खैरगाव, चिंचमंडल आणि राळेगाव तालुक्यातील खैरी या गावात मंडल यात्रेचे स्वागत केले जाणार आहेत तसेच वणी शहरात मंडल यात्रेच्या आगमनानिमित्य शनिवार, दि.३ ऑगस्ट २०२४ ला सायंकाळी ६:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेचे आयोजन केलेले आहे. तरी होणाऱ्या जाहीर सभेला आणि गावागावात स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी जातनिहाय जनगणना समिती, वणी, मारेगाव, झरी, जि.यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे.