आरती ब्रह्मणस्पती ग्रंथाचे प्रकाशन संपन्न
डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचा ७८ वा ग्रंथ
सुरेंद्र इखारे वणी :- श्री गणेश उत्सवाच्या भक्तिमय व अत्यंत लोकप्रिय आरती ब्रह्मणस्पती ! अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर ग्रंथरूपात प्रकाशित झाले आहे.
गाणपत्य सांप्रदायाच्या श्रीक्षेत्र मोरगाव येथील श्री योगींद्र मठ परंपरेत प्रचलित असणाऱ्या या दहा वैशिष्ट्यपूर्ण आरत्यांपैकी आरंभीची आरती मंगलमूर्ती ची आणि शेवटची आरती ब्रह्मणस्पती या दोन आरत्या मुंबई , प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात नियमित गायल्या जातात. मात्र उरलेल्या आठ आरत्या हजारो गणेश भक्तांच्या दृष्टीने प्रथमच ऐकलेल्या होत्या.
यामध्ये देवी सिद्धी, ची देवी बुद्धीची, श्री गणेश पुत्र श्री गुणेशांच्या आरती सोबतच श्री स्वानंदेशाची, श्री ब्रह्माधीशाची आरती यानिमित्ताने प्रथमच गणेश भक्तांच्या समोर व्यापक स्वरूपात प्रकाशित झाल्या.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला असणारा मोरयाचा श्रीमयुरेश्वर अवतार आणि माघ शुद्ध चतुर्थीला असणारा श्रीविनायक अवतार यांच्या देखील दोन वैशिष्ट्यपूर्ण आरत्यांचा यात समावेश आहे.
गाणपत्य सांप्रदायाचे महान आचार्य श्री अंकुशधारी महाराज विरचित या नऊ आरत्यांच्या सोबत शेवटी गाणेश जगद्गुरु भगवान श्री गणेश योगींद्राचार्य महाराज विरचित आरती ब्रह्मणस्पती म्हणजे जणु शेवटचा दुर्वांकुर.
भगवान श्री गणेशांचे परब्रह्म, परमात्म स्वरूप, त्यांचे ब्रह्मणस्पतीत्व, देवी सिद्धी बुद्धी इत्यादींचे स्वरूप, त्यांच्या हातातील गोष्टींपासून वस्त्रांच्या रंगापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या मागे असणारा गूढार्थ, सगुण साकार ब्रह्मस्वरूपातील श्री गुणेश वर्णन, अवतारांच्या आरत्यांच्या निमित्ताने त्यामागील कथा मोरयाचे अलौकिक रूप वर्णन आणि शास्त्रशुद्ध स्वरूप वर्णन अशा अनेक अंगांनी हा ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला आहे.
गाणपत्य संप्रदायाचे उपासक, अभ्यासक आणि प्रचारक असणाऱ्या विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या निरूपणाने साकारलेला हा ग्रंथ जळगाव येथील अविरत प्रकाशनाच्या द्वारे टपाल खर्चासह १२० रुपयात +91 90288 68953 या क्रमांकावर संपर्क केल्यास घरपोच उपलब्ध होऊ शकेल.
सर्व गणेश भक्तांनी या वैशिष्ट्यपूर्ण आरती निरूपण संग्रहाचा लाभ घ्यावा असे प्रकाशकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.