मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक
अन्यायाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन
हिवाळी अधिवेशनात आवाज उचलू – आमदार अभिजित वंजारी।
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी –
मेक इन गडचिरोली च्या नावाखाली अनेक बेरोजगार महिलांची व युवकांची करोडो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधार श्रीनिवास दोंतुला व आमदार देवराव होळी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी नागपूर येथील संविधान चौकात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली गडचिरोली व जिल्ह्यातील इतर अनेक युवकांकडून अगरबत्ती, मत्स्योत्पादन ,राईस मिल, पोल्ट्री फार्म, पोल्ट्री लेयर, ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलँड, एमआयडीसी प्लांट, अशा विविध उद्योग उभारणीसाठी 90 टक्के व शंभर टक्के सबसिडीवर टाकून देतो असे आमिष दाखवून अनेक बेरोजगार युवकांकडून व महिलांकडून एक लाख, दोन लाख,तर कोणाकडून दहा लाख रु.चे कर्ज उचलून करोड रुपये जमा केले व मच्छी खड्ड्याच्या नावाखाली काही तरुणांच्या नावावर दहा लाखाचे लोन उचलून थातूरमातूर गड्डे मारून पैशाची उचल केली. त्या लाभार्थ्यांच्या जमिनी यात गहाण आहे व त्यांना अजून सबसिडी मिळाली नाही. संबंधितांनी याबाबत चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले. परंतु बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.बेरोजगार युवकांना व महिलांना त्यांची फसवणूक झाल्याचे दिसून आल्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले महिला व युवकांनी याची तक्रार पोलीस स्टेशन तथा पालकमंत्री यांच्याकडे केली होती. परंतु हे प्रकरण राजकीय वजनाने दाबण्यात आले. मुख्य सूत्रधार श्रीनिवास दोतुला आता तेलंगणा येथे फरार झाला असून तो कोणाचेही फोन उचलत नाही. त्यामुळे या प्रकरणात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गोरगरीब लोकांचे लाखो रुपये पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली अनेकांचे संसार संसार उघड्यावर आले आहे. यापायी अनेकांनी विदग्ध मनस्थितीत आता आपले काय होणार या विचारात गुरफटून गेले असून, एका व्यक्तीने तर आपल्या पत्नीला घटस्फोटही दिल्याची बाब उघडकीस आली आहे. यामध्ये होमलता शामराव मशाखेत्री, रा.चाकलपेठ या ठिकाणी मच्छी गड्डा खोदण्यासाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर, गंगाधर धर्मा शेडमाके, रा. वेलतूर याला रू. दहा लाख, प्रतिमा ठाकूरदास सरकार रा. जयनगर कुकूटपालन करिता दोन लाख, गणेश नामदेव वासेकर रा. भेंडाळा मच्छी खड्यासाठी दहा लाख, आशिष अरुण पिंपळे रा.चामोर्शी राईस मिलकरिता दोन लाख, वनिता सुरेश राकडे रा. कनेरी अगरबत्ती प्लांट करिता दोन लाख दहा हजार, शालिनी मारोती सोनकर रा. कनेरी अगरबत्ती प्लांट करिता दोन लाख दहा हजार, किरण मोरेश्वर कोलते, कल्पना विश्वनाथ कोलते, ललिता दयाराम करकाडे हे सर्व राहणार कनेरीचे असून यांना अगरबत्ती प्लांट करिता दोन लाख दहा हजार रुपयाचे कर्ज प्राप्त झाले होते. शंकर सरकार रा. लाल डोंगरी पोल्ट्री लेअर करिता एक लाख, अंकुश सुधाकर शेंडे रा.सावली याला बेकरी करिता एक लाख, निकेश जोधरु किरणे अगरबत्ती प्लांट करिता एक लाख 90 हजार, प्रदीप सुपदो मंडल अगरबत्ती प्लांट करिता एक लाख 90 हजार, प्रवीण देविदास चौकत चौधरी एक लाख 90 हजार,राजू गोविंद सरकार हा मयत झाला असून याच्या नावावर एक लाख 90 हजार चे कर्ज आहे. मिलिंद विनायक घोगरे एक लाख नव्वद हजार ,रवींद्र दिलीप चितळे, अमोल विजय घोगरे, राजू हरिदास कोपरे, या सगळ्यांवर प्रत्येकी एक लाख 90 हजार रुपयांचे कर्ज असून बँक वसुलीसाठी तगादा लावत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार अभिजीत वंजारी यांनी केली आहे. या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला उघडे पाडण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवाज उचलू असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.