कोव्हीड मृताच्या कुटुंबाला 50 लाख मिळावेत :
बसपाची पत्र परिषदेत मागणी
जयंत साठे नागपूर प्रतिनिधी – : महानगर पालिकेतील हंसा स्टारबस चे ड्रायव्हर हे मनपाच्या कोव्हीड सेंटरला कार्यरत असताना 15 सप्टेंबर 20 ला त्यांचा मृत्यू झाला. वेळोवेळी निवेदने विनंती करूनही त्यांना पाच पैसे मिळाले नाही. नागपुरातील अधिवेशनापूर्वी *प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजने अंतर्गत कोव्हीड-2019 नुसार कर्तव्य बजावताना मृत झालेल्या त्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत मिळावी* अशी मागणी आज एका पत्र परिषदेद्वारे बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम व प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.
यावेळी मृतक मनीष सुखदेव खंडारे यांच्या पत्नी सौ संध्या मनीष खंडारे, तिचे वडील दयाशंकर कांबळे, बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, माजी मनपा पक्ष नेते गौतम पाटील, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, मुकेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
*प्रकरणाची पार्श्वभूमी*
मृतक धम्मकीर्ती नगर दत्तवाडी येथील निवासी असून ते मनपाद्वारे चालविल्या जाणाऱ्या हंसा स्टारबस मध्ये 2017 पासून ड्रायव्हर होते. ते बर्डी ते डिफेन्स या मार्गावर बस चालवायचे. कोव्हीड काळात मनपाने त्यांची नियुक्ती कोविड सेंटर मध्ये पेशंटची ने आण करणे, मृत व्यक्तीला घाटावर पोचवणे, याची जबाबदारी त्याच्यावर होती. दरम्यान ते कोविड पेशंटच्या संपर्कात आल्याने त्यांना कोविड झाला व यातच 15 सप्टेंबर 20 ला त्यांचा मृत्यू झाला. यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांची पत्नी संध्या ही मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा अधिकाऱ्यांना भेटली. अनेक निवेदने दिली. परंतु त्यांना काहीही मदत मिळाली नाही. सदर प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मनपा व जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने शासनापर्यंत पोहोचविल्याचे सांगण्यात आले.
मृताचे घरी कोणी कमावते नसून त्यांना दहावी व बारावीला शिकणारी दोन मुले आहेत. त्यांच्या पालनपोषणासाठी संध्याला खाजगी काम करावे लागते. कुटुंबाची आर्थिक स्थिती बघून आज बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी विजया बनकर यांची भेट घेण्यात आली. तसेच मनपातील उपायुक्त निर्भय जैन यांना भेटून सदर प्रकरणाची गंभीरता सांगण्यात आली. नागपुरात 19 तारखेपासून होणाऱ्या अधिवेशन पूर्वी मनीषा खंडारे हिला न्याय मिळाला नाही तर बसपा संबंधितांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा पत्र परिषदेत देण्यात आला.
पत्रपरिषदेत स्वतः मृतकाची पत्नी मनीषा खंडारे हिने अधिवेशन काळात न्यायासाठी उपोषणावर बसण्याची तयारी व्यक्त केली. पत्रपरिषदेत बसपा चे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, माजी मनपा पक्ष नेते गौतम पाटील, युवा नेते सदानंद जामगडे, मुकेश मेश्राम, चंद्रशेखर कांबळे, दयाशंकर कांबळे, भदंत बुद्धरत्न प्रामुख्याने उपस्थित होते.
*महामेट्रोला अल्टीमेटम*
महामेट्रो ने मागील दोन वर्षापासून निवेदन करूनही व त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यावरही महापुरुषाच्या अपमानाची दुरुस्ती न केल्यामुळे आज बसपाच्या शिष्टमंडळाने महामेट्रो चे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांची भेट घेऊन त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून उद्यापर्यंत लिखित कळवावे. अन्यथा जातीयवादी महामेट्रोच्या विरोधात निषेधात्मक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
महामेट्रो ला यापूर्वी 15 फेब्रुवारी 2021, 24 फेब्रुवारी 2022 अशी वेळोवेळी निवेदने दिली. महामेट्रो ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अपमान, तसेच कांशीरामजींच्या नावाचा विरोध केला. आदीबाबत निवेदन आहे. प्रधानमंत्री नागपुरात येण्यापूर्वी महामेट्रो रेल ने यावर तोडगा काढावा. अन्यथा निषेधाला सामोरे जावे असा अल्टीमेटम बसपाच्या वतीने देण्यात आला.