मुख्य मार्गांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची शिवशक्ती वाहतूक सेनेची मागणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
शिवशक्ती वाहतूक सेनेने दिला आंदोलनाचा इशारा
सुरेंद्र इखारे वणी – मुख्य मार्गांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले असून अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. रस्त्यांवर उभी राहणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असून या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शिव शक्ती वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर विनाकारण वाहने उभी राहणार नाही, अशी वाहनधारकांना सक्त ताकीद देण्याचेही शिव शक्ती वाहतूक सेनेने निवेदनात म्हटले आहे. रस्त्यावर निष्काळजीपणे उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे यापुढे अपघात झाल्यास शिवशक्ती वाहतूक सेने कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वणी तालुक्यात अनेक कोळसाखानी, कोलडेपो व लाइमस्टोन डोलोमाईटच्या खाणी आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून कोळसा व खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. कोलडेपो मधूनही कोळशाची सतत वाहतूक सुरु असते. तसेच कोल वाशऱ्यांमुळे कोळसा वाहतुकीच्या वाहनांमध्ये आणखीच भर पडली आहे. कोळसा व खनिजांची वाहतूक करणारे शेकडो ट्रक रस्त्याने सुसाट धावत असतात. वणी शहर व तालुक्यात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचं जाळं पसरलं आहे. अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे कॅम्प अगदीच रस्त्यावर असल्याने वाहने रस्त्यावर उभी करून वाहनांच्या दुरुस्तीचे काम केले जाते. तासंतास वाहने रस्त्यावर उभी असतात. कोल वॉशरी व कोलडेपो मध्येही वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावरच ठिय्या मांडून उभे असतात. रात्रीही ट्रक रस्त्यावर तासंतास उभे ठेवले जातात. ट्रकच्या मागील भागाला रेडियम, ब्रेक लाईट, इंडिकेटर लावणे गरजेचे असतांनाही अनेक ट्रक मालक या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे रात्रीला रस्त्यावर उभे असलेले ट्रक छोट्या वाहनधारकांच्या दृष्टीस पडत नाही. या रात्रीच्या वेळेला रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर दुचाक्या आदळून अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आलं आहे. वणी यवतमाळ, वणी वरोरा, वणी घुग्गुस व वणी मुकुटबन या मार्गांनी मोठ्या प्रमाणात कोळसा व खनिजांची वाहतूक सुरु असते. या मार्गांवर रात्रीला नियमबाह्य पद्धतीने ट्रक उभे केले जातात. मागील दोन ते तीन महिन्यात या मार्गांवर अनेक भीषण अपघात झाले आहेत. हे मुख्य मार्गांवर उभे राहणारे ट्रक रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरू लागले आहेत. तेंव्हा या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करून ट्रक मालकांना ताकीद देण्यात यावी. अन्यथा या ट्रकांमुळे निष्पाप जीवांचा बळी गेल्यास शिव शक्ती वाहतूक सेने कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. रस्त्यांवर बेजाबदारपणे उभे करण्यात येणाऱ्या ट्रकांमुळे अपघात होऊन निष्पाप जीवांचे बळी गेल्यास ट्रक मालकांना दोषी ठरवून त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्याची मागणी शिव शक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चंदनखेडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर शिवशक्ती वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू सिरसाट, तालुकाध्यक्ष सचिन मडावी, सदस्य विजय कलारे, नितीन कर्णेवार, अरुण कुळसंगे, सतिश जोगी, बलराज खैरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.