आ. बोदकुरवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे वेकोलीचे रस्त्याचे काम होणार
कार्तिक पटेल वणी:-
वणी-निळापूर-ब्राह्मणी-कोलरपिंपरी- पिंपळगाव हा रस्ता 20 वर्षांपूर्वी वेकोलीने देखभाल दुरुस्ती सह स्वतःकडे परावर्तित करून घेतला होता. या रस्त्यावर दोन- दोन फुटाचे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होऊन यासाठी वारंवार आंदोलन होऊन वेकोली रस्ता दुरुस्त करत नसल्यामुळे येथील कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुख्य महाप्रबंधक वणी नॉर्थ एरिया वणी यांना निवेदनातून तात्काळ या रस्त्याचे काम सुरू न केल्यास 27 जानेवारी पासून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे वेकोली ने तात्काळ निविदा काढून या रस्त्याचे काम सुरू करीत आहेत. असे लेखी कळवून आंदोलन न करण्याची विनंती केली आहे.
वणी ते कोलरपिंपरी, पिंपळगाव पर्यंत वेकोलीच्या अवजड वाहनातून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची अतिशय दयनीय स्थिती होऊन जागोजागी दोन, दोन फुटाचे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे सामान्य वाहतूक अशक्य झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील निळापूर, ब्राह्मणी, कोलरपिंपरी, पिंपळगाव या गावातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी अनेक निवेदने देऊन वेकोली कडे रस्त्याची डागडुजी न करता पुन्हा नवीन रस्ता तयार करण्याची मागणी करून आंदोलन करूनही वेकोली प्रशासन या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातल्यानंतर आमदारांनी या रस्त्याची पूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतरही वेकोली प्रशासनाला जाग न आल्यामुळे या रस्त्याच्या निविदा काढून त्वरित रस्त्याचे बांधकाम वेकोली ने करावे. अन्यथा दि. 27 जानेवारी पासून या रस्त्यावरून वेकोलीची होणारी कोळशाची वाहतूक संबंधित ग्रामस्थांना सोबत घेऊन बेमुदत रोखण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे आमदारांनी दिला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वेकोली प्रशासनाने ताबडतोब दोन टप्प्यात निविदा काढून रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम 3 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येत आहे. अशी लेखी माहिती वेकोली दिल्यामुळे या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.