चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम गरजेचे – गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार
मार्डीच्या आदर्श विद्यालयात पार पडले स्नेहसंमेलन
सुरेंद्र इखारे, वणी :-. ‘प्रत्येकात काहीना काही कलागुण असतात. याच कलागुणांना योग्य संधी मिळाली तर आजचे बालक उद्याचे नामवंत कलाकार होऊ शकतात. म्हणून चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन मारेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडुरवार यांनी केले. मार्डी येथील आदर्श विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेनाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वि. मा. ताजने होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक तथा पत्रकार भास्कर धानफुलें, पो.पाटील डॉ. प्रशांत पाटील, केंद्रप्रमुख अरविंद ताटेवार, दिवाकर पंडिले, रत्नाकर जुमळे उपस्थित होते. याप्रसंगी आर्मी सैनिक माजी विद्यार्थी वैभव चिंचोळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
23 जानेवारी पासून सुरू झालेल्या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात क्रीडा स्पर्धा आणि एकल नृत्य, समूह नृत्य, नाटिका, एकांकिका आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. हनुमान सोयाम, रेहान शेख हे उत्कृष्ट कबड्डीपटू ठरले. तर हर्षदा गाणफाडे, तृप्ती ढवस, श्रुतिका नावडे, आचल खैरे, गौरी देवाळकर यांनी सादर केलेल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली. हर्षदा गाणफाडे हिने सादर केलेल्या ‘आई’ या एकपात्री नाटकाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू ओरघळले. चिमुकल्यांनी आपल्या कालागुणांची मुक्तपणे उधळण केल्याने मान्यवरही भारावून गेले. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक स्पर्धेचे परीक्षण नितु मेश्राम, अनंता शिवरकर यांनी केले. क्रीडापंच म्हणून एकनाथ येटी, ज्ञानेश्वर दातारकर यांनी काम पाहिले. उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश ढुमने यांनी केले. संचालन प्रा.भास्कर राऊत, प्रा. सुरेश नाखले यांनी केले. आभार जगन भोंगळे यांनी मानले. अंकुश कांबळे, भास्कर जिवतोडे यांनी सहकार्य केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.