डॉ. करमसिंग राजपूत यांची ४७ व्या अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
सुरेंद्र इखारे वणी – शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. करमसिंग राजपूत यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे संपन्न होणाऱ्या ४७ व्या विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमध्ये १०० पेक्षा अधिक निबंध, अर्थशास्त्रावरील अभ्यासक्रमाशी संबंधित ११ पुस्तके, विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमधून १०० वर व्याख्याने, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर सलग दोन वेळा सदस्य, अमरावती आणि नागपूर विद्यापीठात आचार्य पदवी मार्गदर्शक अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे.
अर्थशास्त्र विषयाची भारतातील सर्वात प्राचीन असणाऱ्या या परिषदेच्या आजवरच्या अधिवेशनांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांनी आजवर अध्यक्षपद भूषविले असून हा वैशिष्ट्यपूर्ण सन्मान त्यांना प्राप्त होत असल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.