वणी शहराचा हैद्राबाद रस्ता खड्ड्यात *
रस्त्यावर चालणाऱ्या शाळकरी मुलांचा व वृद्धांचा जीव धोक्यात *
प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिक संतप्त *
सुरेंद्र इखारे वणी – शहरातील मुख्य मार्ग जुना हैद्राबाद रस्ता गेल्या कित्येक महिन्यापासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पायी चालणाऱ्याना सुद्धा पायवाट नशिबात नाही अशी अवस्था असून सुद्धा प्रशासन गप्प बसले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ,शालेय विद्यार्थ्यांचा लोंढा, वृद्धांचे जाणे येणे असताना या रस्त्यावर किरकोळ अपघात नित्याचे झाले आहे तरी देखील नगर पालिका प्रशासन अधिकारी व प्रशासकीय अधिकारी। हे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे व जनतेला वाली नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासन व प्रशासकविषयी रोष आहे. वणी शहराचे मुख्य ह्दय व मुख्य मार्ग असलेले टिळक चौक ते दीपक टॉकीज चौकापर्यंतचा हैद्राबाद रस्ता खड्ड्यात आहे. या रस्त्यावर पायवाट सुद्धा तयार होऊ शकत नाही अशी दुरवस्था झालेली आहे. शिवाजी चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक, टागोर चौक, सुर्योदय चौक, नेताजी चौक, सावरकर चौक, भगतसिंग चौक, दीपक टॉकीज चौकापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था आहे. या गँभिर बाबींची नगर पालिकेचे प्रशासन कोणत्याच प्रकारची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील नागरिक घरातून बाहेर पडत असताना चिमुकल्या मुलांना तसेच वयोवृद्धांना रस्त्याने चालताना खाली पाहून व सांभाळून जावे असा इशारा घरातील मंडळी देताना दिसून येत आहे. कारण खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे अपघात होऊन अपंगत्व येत आहे इतकेच नव्हे तर दररोज या रस्त्यावर खड्डा चुकवताना वाहनांची टक्कर होऊन अपघात होत आहे. तसेच या रस्त्यावर चालणाऱ्याना कंबरेचा, मणक्याचे, अति झटक्यामुळे ह्दयविकाराची भीती वाढली आहे अशाही परिस्थितीत नगर पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. तेव्हा नागरिकांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे तरी शहरातील मुख्य हैद्राबाद रस्ता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित आहे तेव्हा प्रशासकाने तरी या शहरातील जनतेचा विचार करून किंवा स्वतः अनुभव घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कार्य करावे अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.