‘गरुडा’ने परवा मागितले होते पुरावे, किशोर गजभियेंनी आज पत्रकारांसमोर सादर केले !
नागपूर जयंत साठे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंबाझरी बचाव कृती समितीने बाबासाहेबांचे स्मारक गरुडा कंपनीने पाडल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ती जमीन स्मारकाची होती, याचे पुरावे काय, असा सवाल गरुडा कंपनीतर्फे करण्यात आला होता. त्यानंतर आज समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले.
स्मारक वादळवाऱ्याने पडले नाही तर पाडण्यात आले, याचा पुरावा देताना गजभिये म्हणाले, स्मारक ८ जूनच्या पूर्वी पडले. त्यानंतर १६ जून २०२१ रोजी आम्ही पोलिसांना सोबत घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. पुरावे म्हणून तेव्हाचे फोटो, व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आम्ही गेलो त्यापूर्वीच स्मारक उद्ध्वस्त केले होते. तो इमला जर नैसर्गिक आपत्तीमध्ये पडला, तर सिमेंट, कॉंक्रीटच्या ढिगाऱ्यांमध्ये लोखंडाच्या सळाखीसुद्धा पाहिजे होत्या. पण त्या दिसल्या नाहीत. दुसरा पुरावा म्हणजे राज्य नगररचना विभागाचा आहे. त्यामध्ये ती जमीन स्मारकाची होती, हे दिसते. पण आता त्यावरून स्मारकाचा उल्लेख काढून त्याजागी नझूलचा उल्लेख करण्यात आला आहे. तिसरा पुरावा म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या नगर विकास विभागाचा नकाशा आहे. हा आम्ही माहितीच्या अधिकारात मागितला. महानगरपालिकेच्या नकाशामध्येही तसा उल्लेख बघायला मिळतो. पण यामध्ये जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी खातेफोड करून मखलाशी केलेली आहे. हे त्यांनी स्वतः केलेले नाही, तर कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेले आहे. यामागे कुणीतरी खासगी व्यक्ती आहे. कारण हा फेरफार सन २०२१चा आहे आणि हा सर्व कारभार गरुडा कंपनीनेच केल्या असल्याचा स्पष्ट आरोप किशोर गजभिये यांनी केला.
स्मारकाचे बांधकाम पाडण्याची परवानगी मागणारे पत्र गरुडा कंपनीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला केली होती. त्यांनीच हे स्मारक बुलडोझर लावून पाडले आहे. ही पक्की इमारत वादळवाऱ्याने पडली, असे म्हणणे म्हणजे समस्त नागपूरकरांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. त्यांची ही वक्तव्ये निराधार व गैरसमज पसरविणारी आहेत. त्याचा कृती समितीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे किशोर गजभिये यांनी आज सांगितले.