वणी विधानसभा क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल
ग्रामपंचायत सदस्य व सरपंचाना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार
सुरेन्द्र इखारे वणी :- वणी विधानसभा क्षेत्रातील वणी,मारेगाव व झरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतदानाची प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहेत. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल 2023 ला मतदान होणार आहे तर मारेगाव व झरी बाजार समितीसाठी 30 एप्रिल 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेची सुरुवात 27 मार्च पासून सुरू झाली असून 3 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता . 5 एप्रिलला नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. 6 एप्रिल रोजी वैध नामनिर्देशन पत्रे प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 20 एप्रिल पर्यंत उमेदवाराला नामांकन अर्ज परत घेता येणार आहे. त्यामुळे या दिवशीच वणी विधानसभा क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे चित्र स्पष्ट होणार आहे 21 एप्रिलला उमेदवारांची अंतिम मतदार यादी आणि चिन्ह वाटप केले जाणार आहे . वणी विधानसभा क्षेत्रातील वणी,मारेगाव व झरी बाजार समितीसाठी सहकारी संस्था मतदार , ग्रामपंचायत मतदारसंघ व व्यापारी अडते,हमाल मापारी व तोलारी या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य व सरपंच याना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे त्यामुळे ग्रामपंचायत मतदारसंघातही चुरस निर्माण झाली आहे.यावर्षीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता असताना त्यात तिसऱ्या पॅनेलची शक्यता बळावली असल्याचे चित्र चर्चेतून दिसून येत आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे ही निवडणूक पक्षाच्या प्रतिष्ठेची राहणार आहे अशी चर्चा नागरिक मतदारातून दिसून येत आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय पुढारी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.