इंग्लंडमध्ये बुद्ध आंबेडकर मैत्री संघातर्फे आंबेडकर जयंती
नागपूर जयंत साठे:- माणसाला माणसात आणणार्या, संपूर्ण मानवी समाजाला समतेची शिकवण देणाऱ्या महामानव, क्रांतीपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आली. त्यापैकी इंग्लंडमधील”बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ,” द्वारा आयोजित “जयंती 2023” हा कार्यक्रम आत्यंतिक हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला.
क्रान्तिसुर्य महात्मा फुले यांच्या 196 व्या आणि भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विविध आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांनी मधुर आवाजात त्रिसरण, पंचशील आणि बुद्धवंदना पासून केली त्यानंतर महामानवांना मानवंदना देण्यात आली. लेझिमच्या आणि ढोल ताशांच्या गजरात डॉ. बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली आणि जयभीम च्या जयघोषाने संपूर्ण हॉल निनादून गेला.
या कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महान सम्राट अशोक, राजर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज, संत कबीर यांच्या जीवनावर आधारित नृत्यं, पोवाडा, भीम गीते, कविता वाचन, प्रतीकात्मक वेशभूषा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटिश सुधारक ह्यांचा तुलनात्मक विश्लेषण करणारी डॉक्युमेंटरी आणि वाद्यवादन जुगलबंदी हयांचे प्रभावी सादरीकरण झाले. विशेष कलाकृती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य ज्योतिबा आणि स्त्री उद्धारक सावित्रीबाई फुले ह्याच्या क्रांतिकारक कर्तृत्वामुळे संबंध भारतातील स्त्रियांच्या जीवनावर जो परिणाम झाला आणि समस्त स्त्रिया कश्या प्रगतीपथावर आरूढ झाल्या ह्याचे चित्रण करणारी सुंदर लघुनाटिका सादर करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “कोणत्याही समाजाची प्रगति ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते” असे म्हटले होते ही बाब हेरून ह्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, सूत्रसंचालन उच्चविद्याविभूषित महिलांनी केले होते हे विशेष.
बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, UK चा प्रयत्न हा नेहमी लहान मुलांना आंबेडकरी आणि बुद्ध धम्माचे संस्कार आणि परंपरा देण्याचा असतो. बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, यूके मध्ये आंबेडकरी आणि बुद्धिस्ट सामाजिक आणि सांस्कृतिक मंच निर्माण करण्यात प्रयत्नशील आहे. जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समजातील लहान, मोठे यांना त्यांचे कौशल्य सादर करण्यास मंच उपलब्ध झाला. संधीचे सोने करत मुलांनी मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली.
युनायटेड किंगडम मध्ये राहून देखिल बुध्द धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू जी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, यांच्यासह सर्व महामानवांची अमुल्य विचारधारा आपल्या मुलांमध्ये रुजवत आहेत हे विशेष.
ही संघटना युनाइटेड किंग्डम येथील कौटुंबिक संघटन असून येथे राहणाऱ्या कुटुंबाना, स्टुडंट्स ना एकत्र आणून आपला सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न सातत्याने करते, त्याचवेळी कोणत्याही राजकीय संघटनांपासून अलिप्त आहे.
या कार्यक्रमासाठी युनायटेड किंग्डम च्या विविध भागातून लोकं आले होते. भरपूर लोकं स्कॉटलंड आणि वेल्स ह्या युनायटेड किंग्डम मधील देशांतून सुद्धा आले होते.
बहुजनांना शेकडाे वर्षे गुलामीत जाेखडबंद ठेवले हाेते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच त्यांना त्यांच्या गुणवत्तेत प्रमाणे काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच ‘उद्धरली काेटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ म्हणत “आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं” ह्याची जाण ठेवत अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, पीएचडी होल्डर्स, स्टुडंट्स सातासमुद्रापार जाऊन प्रस्थापित झालेत आणि समाजाचे उत्तरदायित्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांचे विचार पसरवित आहेत.