बार्टी प्रशिक्षण चालू ठेवा आंदोलनात हजारोंचा सहभाग
नागपूर जयंत साठे: बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण चालू ठेवण्याकरिता आज पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरु झाले. हिंगोली , जालना , भंडारा , सातारा , पालघर , नागपूर , चंद्रपूर नवी मुंबई इत्यादी अनेक जिल्ह्यातील सामाजिक संघटना , प्रशिक्षण केंद्र विद्यार्थी व कर्मचारी यांनीही सहभाग घेतला आहे.
यातील प्रमुख मागणी ही *“ सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी प्रशिक्षणा संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी करा “* ही आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी सामाजिक न्याय विभागाचे सचिव करीत नाहीत , आणि त्यामुळे मागील वर्षात 6000 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण मंजूर असून देखील राबविले गेले नाही. चालू वर्षात 18000 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण यामुळे ठप्प पडले असल्याची वस्तुस्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नाकेबंदी होत आहे.
यावर सामाजिक न्याय विभागाने “बार्टीचे सर्व प्रशिक्षण सुरु आहेत” अशी माहिती प्रेस नोट च्या माध्यमातून सोशल मिडिया वर फिरविली गेली. यातील वस्तुस्थिती मात्र तपासली असता , कोणत्याही जिल्ह्यात प्रशिक्षण सुरु नाहीत असे आढळून आले.
राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे , परंतु ऐन परीक्षांच्या तोंडावर राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे मंजूर असलेले प्रशिक्षण मात्र मागील ९ महिन्यापासून बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने प्रशिक्षण सुरु आहेत अशी खोटी बातमी पसरविली असल्याचे स्पष्ट होत आहे.
नेमके हे प्रशिक्षण बंद करण्यामागील हेतू काय असे आंदोलकांना विचारले असता, त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यावर विविध आरोप केले. त्यांना बार्टी च्या सर्व योजना नासवायच्या आहेत, त्या चालूच नये अशी परिस्थिती निर्माण करायची आहे असे आरोप त्यांनी केले .
सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय पारित करून , पोलीस व मिलिटरी भरती, बँक , रेल्वे, एलआयसी ई. परीक्षा तसेच खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यांच्या करिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि इंटरव्यू याकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता योग्य वार्षिक नियोजन आखून दिले. तसेच हे प्रशिक्षण २४ जिल्ह्यातील बार्टी अंतर्गत काम करीत असलेल्या ३० प्रशिक्षण केंद्रामार्फत राबवावे , आणि ज्या १२ जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र नाहीत , किंवा जेथे प्रशिक्षण केंद्र अधिक करण्याची आवशक्यता आहे तेथे तत्काळ प्रशिक्षण केंद्र निवड करावे असे स्पष्ट निर्देश आहेत. असे असताना उर्वरीत १२ जिल्ह्यात सुमंत भांगे सचिव यांनी २ वर्षे लोटून देखील अद्याप प्रशिक्षण केंद्र निवड केले नाहीत , व त्याउलट ज्या २४ जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र आहेत तेथे नवीन प्रशिक्षण केंद्र निवड करण्याचा खटाटोप चालविलेला आहे. हे सर्व शासन निर्णयाच्या विपरीत आहे. या आधीचे सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव , प्रधान सचिव इत्यादींनी केले काम चुकीचे आहे म्हणून हे सारे बंद करावे असा सचिव सुमंत भांगे यांचा मानस आहे.
यामुळे मात्र दरेक वर्षी हजारो अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तिकडे कोणतेही प्रशिक्षण बंद नसल्याची खोटी माहिती पसरवून सचिव सुमंत भांगे हे त्यांच्या हाताखाली काम करीत असलेल्या अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजाची दिशाभूल करीत आहेत.
* बार्टी प्रशिक्षण बचाओ कृती समिती महाराष्ट्र*
संपर्क :
9421320548
9822816872
9082102879