अनिल देशमुखांना फसवण्यात कोणत्या शक्तीचा हात होता?
राष्ट्रवादीचे प्रवक्ता कुंटे यांचा सवाल
:जयंत साठे नागपूर:
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे निलंबन नुकतेच राज्य सरकारने रद्दे केले. कॅटने वारंवार राज्य सरकारला त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी अहवाल मागितला होता. तो न दिल्याने कॅटने एकतर्फी निर्णय घेत त्याचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारने कॅटला अहवाल का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित करीत परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द करण्याचा आदेश बेकायदेशीर व आरोपीला संरक्षण देणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे.
आज (ता. १५) नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना कुंटे पाटील म्हणाले, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये किमान आठ ते १० गुन्हे दाखल आहेत. यात खंडणी, कायद्याचा दुरुपयोग व बदल्यांमध्ये वसुली, यांसारख्या गंभीर घटनांची नोंद आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जे जिलेटिन ठेवण्यात आले होते, त्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा परमबीर सिंह आहे आणि त्यामुळे त्यांची खालच्या पदावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदली केली.
या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या एनआयएने कोर्टात जे आरोपपत्र दाखल केले, त्यातसुध्दा परमबीर सिंह यांची या प्रकरणात मुख्य भूमिका होती, असे नमूद केले आहे. अंबानींच्या घरासमोर जिलेटिन ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा याचा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असतानासुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना संरक्षण का देण्यात येत आहे, असा आरोप कुंटे पाटील यांनी केला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी आरोप केले आणि त्यानंतर ते फरार झाले. त्यांनी न्यायालयात किंवा न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर अनेक वेळा विचारणा करुनसुध्दा कोणतेही पुरावे सादर केले नाही. उलट मी केवळ ऐकीव माहितीवर हे आरोप केले आहेत. त्याचे माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही, असे शपथपत्र सादर केले. परंतु त्यांच्या खोट्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना तब्बल १४ महिने तुरुंगांत ठेवण्यात आले.
न्यायालयानेसुद्धा जामीन देताना अनिल देशमुख यांच्यावरील आरोप ऐकीव माहितीवर असून कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. परमबीर सिंह यांचा राजकीय वापर करून अनिल देशमुख यांना फसविण्यात आले. परमबीर सिंह यांच्या मागे एका अदृश्य राजकीय शक्तीचा हात आहे, असा आम्ही वारंवार आरोप करीत होतो. कॅटला राज्य सरकारने अहवाल न देणे आणि कॅटने एकतर्फी दिलेल्या आदेशाचा वापर करीत राज्य सरकारने त्यांचे निलंबन रद्द करणे. यावरून अनिल देशमुख यांना फसविण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर कोणत्या अदृश्य शक्तीने केला होता, हे आता समोर आले असल्याचेही कुंटे पाटील म्हणाले.
आवाज दाबण्यासाठी जयंत पाटलांना नोटीस..
भारतीय जनता पक्ष व सरकारच्या विरोधात जो बोलतो, त्याचा आवाज दाबण्याचे काम राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. यासाठी ते विविध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत आहेत. अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई, नवाब मलिक यांची अटक तसेच हसन मुशरीफ यांच्या घरावरील छापेमारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस हा याबद्दलचा सबळ पुरावा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे राज्यभर फिरून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार करीत आहे. जो आपल्या विरोधात बोलेल, त्याला आत टाका हा भाजपचा एकसूत्री कार्यक्रम असून राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अशा हुकूमशाही प्रवृत्तीकडे न झुकता रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहील, असेही कुंटे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी आमदार दिनानाथ पडोळे, अनिल अहिरकर,
वेदप्रकाश आर्य, बजरंगसिंग परिहार, आभा पांडे, दिलीप पनकुले, वर्षा शामकुळे, श्रीकांत शिवणकर व सुखदेव वंजारी उपस्थित होते.