सहा बाजार समित्या जिंकणाऱ्या कॉंग्रेसला उमरेडने पुन्हा दिली हुलकावणी !
:जयंत साठे नागपूर:
उमरेड विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या असलेल्या उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपने ११ जागांवर विजय मिळवून पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. तर आमदार राजू पारवे यांच्या गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले.
नागपूर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुका माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. आतापर्यंत सात बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. सावनेर, मौदा, पारशिवनी, भिवापूर, कुही, रामटेक येथील निवडणुका पार पडल्या. यातील सावनेर बाजार समितीची बिनविरोध निवड करून विजयी पताका आमदार केदारांनी उडविल्या.
पारशिवनी, मौदा, भिवापूर, कुही या बाजार समित्यांवरसुद्धा कॉंग्रेस प्रणीत नेत्यांच्या गटांचा विजय झाला. उमरेड मतदारसंघातील भिवापूर आणि कुही बाजार समितीवर आमदार पारवे आणि माजी आमदार राजेंद्र मुळक गटाने विजय मिळविला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या उमरेड बाजार समितीवर कॉंग्रेसला विजय मिळविला आला नाही.
भाजपने ११ जागा जिंकून बाजार समिती पुन्हा ताब्यात घेतली. माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आनंद राऊत यांच्यासारख्या नेत्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली. यामुळे सहज विजय मिळविता आला. तर राजू पारवे यांच्या नेतृत्वात लढण्यात आलेल्या पॅनेलने सात जागांवर विजय मिळवून अस्तित्व दाखवून दिले.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सेवा सहकारी संस्था (सर्वसाधारण) मतदार संघातून भाजपचे रूपचंद रामकृष्ण कडू, संदीप रामकृष्ण हुलके, राहुल कवडू नागेकर, महेश वासुदेव मरघडे, मनोहर नामदेव धोपटे,भोजराज पुंडलिकराव दांदडे व ज्ञानेश्वर कृष्णा भोयर विजयी झाले असून काँग्रेसचे दिलीप पुंडलिक व भाजपचे ज्ञानेश्वर कृष्णा भोयर यांना प्रत्येकी २२३ अशी समान मते मिळाली.
लकी रोशन नंदनवार या चिमुकल्याच्या हाताने ईश्वर चिठ्ठी काढली. त्यात भाजपचे ज्ञानेश्वर कृष्णा भोयर यांनी विजयी झाले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांत जल्लोष पाहायला मिळाला. सेवा सहकारी इतर मागासवर्गीय गटातून राजकुमार बापूराव कोहपरे विजयी झाले. तर सेवा सहकारी भटक्या विमुक्त जाती गटातून रंगराव रामचंद्र नेवारे यांनी बाजी मारली.
सेवा सहकारी महिला राखीव गटातून यशोदा बंडू अंबालकर, संगीता भगत ढेंगरे यांना विजयश्री मिळाली. ग्रामपंचायत मतदारसंघातून काँग्रेसचे शिवदास कुकुडकर, नितीन बालपांडे, भिकाजी भोयर, छोटू मोटघरे विजयी झालेत. अडते व व्यापारी संघातून दत्तू फटींग व विजय खवास जिंकलेत तर हमाल व व्यापारी मतदारसंघातून सुभाष हरिभाऊ बारापात्रे निवडून आले.
ईश्वरचिठ्ठीही भाजपच्या बाजूने..
१८ जागा असलेल्या बाजार समितीमध्ये भाजपचे १० तर कॉंग्रेसचे सात उमेदवार विजयी झाले. एका जागेवर दोन्ही उमेदवारांना सारखी मते मिळाली. काँग्रेसचे दिलीप पुंडलिक भोयर व भाजपचे ज्ञानेश्वर कृष्णा भोयर यांना प्रत्येकी २२३ अशी समान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी ईश्वर चिठ्ठीसुद्धा भाजपच्या बाजूने गेली. भाजपचे ज्ञानेश्वर कृष्णा भोयर हे निवडून आले.