संपादकीय वणी 24 न्यूज “गुरुतत्त्व”
सुरेंद्र इखारे वणी :- मनुष्य जन्माच्या लौकिक तसेच आध्यात्मिक उत्कर्षाकरिता व जीवनाच्या सफलता व पूर्णत्वाकरिता सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही. मुख्यत्वे तीन गुरूंचे मनुष्य जीवनात फार महत्त्व आहे. जन्मदाते माता पिता लौकिक विद्या शिकवणारे लौकिक गुरु आणि जीवनाचे उद्दिष्ट पटवून देऊन मोक्ष प्राप्तीकडे नेणारे मोक्षगुरू ज्याला आध्यात्मिक गुरु देखील म्हणतात. तीनही गुरूंचं अपरंपार महत्त्व आहे. पूर्व सुकृताने आम्हाला परमपूज्य श्री दत्ता काका ( डीपी कुलकर्णी ) लाभले. आज त्यांचे पुण्यस्मरण
दत्ता काका हे असा व्यक्तिमत्व होतं की जिथे प्रत्येक व्यक्तीला ते आपले वाटायचे आणि आजही वाटतात. कोणाला बंधू तर कोणाला पिता कोणासाठी सद्गुरु माऊली तर कोणासाठी सखा असे विविध नाते या एका व्यक्तीरेखेत होते. त्यांनी सबंध आयुष्य परमपूज्य गोंदवलेकर महाराजा च्या विचार सौंदर्याच्या प्रसाराकरिता आणि आपल्यासारख्या प्रापंचिक जड जीवांचा उद्धार होण्याकरिता स्वतःच जीवन समर्पण केलं. आबाल वृद्ध विशेषतः तरुण मंडळींना दत्ता काकां प्रति विशेष प्रेम दत्ता काकांचा महत्त्वाचा गुण म्हणजे ते परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचा तत्त्वज्ञान सगळ्यांना समजेल अशा भाषेत विशेषतः रूपक कथेत द्वारे सांगत आणि त्याद्वारे नकळत भगवत प्रेमाचं बीज प्रत्येकाच्या हृदयामध्ये रोवत. बदलत्या काळानुसार त्यांनी फार कधी कोणावर बंधने घातली नाहीत पण नामस्मनाबद्दल त्यांची विशेषतः आग्रही भूमिका असायची. तरुण मंडळींना ते नेहमी उद्यमी राहायला सांगाय चे. त्यांच्याकडे बरेच संप्रदायाचे विविध पंथाचे लोक यायचे. पण ते प्रत्येकाचा शंका निरसन करताना त्याला समजेल त्या पद्धतीने सांगायचे व नामाचे महत्त्व पटवून द्यायचे. त्यांनी आयुष्यात कधी एकमेकांमध्ये किंवा इतर कोणत्याही गुरु परंपरेमध्ये भेदाभेद केला नाही. ते नेहमी सांगत की हे शेवटी एक तत्व आहे. ते म्हणजे गुरुतत्त्व.
गुरुतत्त्वा बाबत सांगताना मला दत्ता काकांसोबत असताना एका प्रसंगाची प्रकर्षाने आठवण येते. एकदा पुणे येथे काही साधकांची सुखसंवाद करीत असताना परमपूज्य दत्ता काका यांच्या भेटीला एक साधक आलेत. त्या गृहस्थांच्या बऱ्याच काही शंका होत्या. त्या सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर त्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नाम जप करण्यास दत्त काका यांनी त्यांना सांगितले. अतिशय आनंदी होऊन ते गृहस्थ परतलेत. थोड्याच वेळात तिथे एक सात्विक महिला आली. काही प्रपंच एक अडचणींमुळे त्यांचा मन अत्यंत उद्विग्न झालेलं होतं. डोक्यात बरेच विचार होते. त्या येताच परमपूज्य काकांनी ओम नमो भगवते वासुदेवाय असा मोठ्याने नाम घोष केला. त्या महिलेला अश्रू अनावर झाले आणि त्या निशब्द झाल्या. त्यांचे डोळ्यातील अश्रू पाहून त्यांना उद्देशून दत्ता काका म्हणालेत – त्या महिलेच्या गुरूंचे नाव घेऊन तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं त्यांना आवडेल का? नकळत त्या अत्यंत शांत झाल्यात.
त्या महिलेचे गुरु निर्गुणात गेल्यानंतर त्या महिलेला बरेच काही समस्या होत्या बऱ्याच शंका होत्या. त्यांना श्रीकृष्णाचा मंत्र जप मिळाला होता. पण नकळत सर्व विचारांचं काहूर क्षणात निघून गेलं. हा सर्व प्रसंग झाल्यानंतर तेथील एका गृहस्थाने दत्ता काकांना विचारले की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला असा वेगवेगळ्या मंत्र जप का सांगता?
त्यावर दत्ता काका हसून म्हणाले शेवटी हे सर्व गुरुतत्त्व एकच आहे. संप्रदाय भेद व इतर भेदाभेद ज्या ठिकाणी लयास जातात व जेथे विशुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते ते गुरुतत्त्व होय. सर्व सदपुरुषांनी त्यांच्या शिकवणुकीत हरिनाम संकीर्तनावर विशेष भर दिला
योग मार्ग असो वा भक्तिमार्ग सर्वांमध्ये एक नाम हेच ईश्वर तत्व आहे तेच गुरुतत्त्व आहे
त्यामुळे मुळात लौकिक दृष्ट्या प्रत्येक गुरुपरंपरा या जरी वेगवेगळ्या दिसल्या, त्यांची उपासना पद्धती मार्ग जरी वेगळे वाटले तरी त्या सर्वांचे तत्व मात्र एकच आहे. त्यामुळे सद शिष्य कधी आध्यात्मिक गुरूंमध्ये आप इतर असा भेदभाव करीत नसतो. पण या सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला अध्यात्मिक गुरु मिळणे गरजेचे आहे आणि ते पूर्व सुकृताने प्राप्त होऊ शकते.
17 मे 2012 रोजी या महापुरुषाने हा नश्वर देह सोडला व ते सद्गुरु चरणी विलीन झाले. आज ते देहाणी जरी आमच्यात नसेल पण त्यांनी सांगितलेल्या विचारांवर मार्गक्रमण करताना त्यांच्या अस्तित्वाची आजही जाणीव होते. कारण सद्गुरु देहाने जरी गेलेत तरी त्यांनी दिलेलं नाम मात्र चिरंजीव आहे
आज परम पूज्य श्री दत्ता काकांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांना प्रिय असलेला भगवंताचं नाम आपल्या सर्वांकडून अधिकाधिक व्हावं आणि त्यांना अभिप्रेत असलेली जीवन सरणी आचरणात यावी याकरिता त्यांच्या चरणी प्रार्थना करतो
ओंकार देशपांडे
नामयोगी परिवार वणी
9763721094