आंबेडकर भवनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा उभारणार -आ. जितेंद्र आव्हाड
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे नागपूर-: नागपूरच्या सुप्रसिद्ध अंबाझरी तलावाच्या बाजूला ज्या ठिकाणी करोडो रुपये खर्चून आता पर्यटन केंद्र बनवले जात आहे; त्या ठिकाणी 1974 साली शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी महानगरपालिकेला 44 एकर जमिन दिली होती. त्यामधील 20 एकरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारा आणि इतर जागेचा उद्यानासाठी उपयोग करा असे सांगण्यात आले होते. महानगरपालिकेने काही खर्च करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारले. 40 वर्षानंतर अर्थातच ते कमकुवत झालं आणि त्याची डागडुजी करणे गरजेचं होत. पण, ते न करता शासनाने हि जमीन परत घेतली आणि ती पर्यटनासाठी देऊ केली. आता त्या जागी बुलडोझर आणि जेसीबी लावून तेथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जमीनदोस्त करण्यात आले आहे आणि ती जमिन मुंबईतील एका उद्योगपतीला 1 कोटी 50 लाखामध्ये देण्यात आली आहे. म्हणजे यांची मानसिकता बघा… अंबाझरी तलावाच्या बाजूला असलेली 44 एकर जमिन हा नागपूरमधील सर्वात महागडा भाग. या ठिकाणी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन काढून घ्यायचं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकून त्यांचे समर्थक व त्यांच्या विचारांवर चालणारी एक पिढी तयार होत असे. अशा वास्तूवर बुलडोझर, जेसीबी चालवून ते जमिनदोस्त करायचं. आणि ते मुंबईमधील एका उद्योगपतीला 1 कोटी 50 लाख रुपयाला ती जमिन द्यायची. 44 एकर जमिन नागपूर मधील कुठल्या भागामध्ये 1 कोटी 50 लाखाला मिळते हा भाग शासनाने दाखवून द्यावा.
दुर्दैवाची बाब ही कि, शासनाने महापालिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिलेली जमिन महापालिका परत शासनाला देते आणि त्या जमिनीचे अखेरीस वाटोळं होत. सद्यस्थितीमध्ये ही जमिन मोकळी आहे. हा मोठा स्कॅम आहे. ही जमिन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देण्यात आली आहे. ती आम्ही कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही. याविरुद्ध आता जोरदार आंदोलन उभं केलं जाईल.असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.