पोलीस ठाण्यात वा इतरत्र पोलीसांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास बंधन नाही – पोलीस आयुक्त अमितेशकुमार
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे – पोलीस ठाण्यामध्ये व्हीडीओ रेकॉर्डींग संबंधाने नागपूर शहर पोलीस विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून त्यात पोलिसांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास बंधन नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल क्रिमीनल अॅपलीकेशन नं. ६१५/२०२१ मध्ये मा. न्यायालयाने दिनांक २६/०७/२०२२ रोजी आदेश पारीत केला आहे की, केंद्र सरकार द्वारे पारित अधिकृत गुपिते (ऑफिशियल सिक्रेट्स) कायदा १९२३ चे कलम २ (८) मध्ये परिभाषित केल्यानुसार ‘निषिद्ध ठिकाण’ ची व्याख्या प्रासंगिक आहे. ही एक सर्व समावेशक व्याख्या आहे, ज्यात विशेषतः पोलीस ठाणेचा समावेश, ठिकाणे किंवा आस्थापना पैकी एक म्हणून केला जात नाही.
त्याअनुषंगाने क पोउपआ/ मुख्या/ परिपत्रक दिनांक २८/१२/२०२२ रोजी काढण्यात आले होते. परंतु असे निदर्शनास आले आहे की, पोलीस ठाणे येथे आलेल्या व्यक्तिींनी व्हीडीओ रेकॉर्डींग करताना दिसून आल्यास कर्तव्यावरील अधिकारी / अंमलदार त्यांचेशी वाद घालतात आणि गुन्हा नोंद करतात. ही अत्यंत खेदाची बाब आहे. पोलीस ठाणे हे सार्वजनिक स्थळ असून पोलीस ठाणे मध्ये येणारे व्यक्तींनी व्हीडीओ रेकॉर्डींग केल्यास त्यास अडकविण्याचा प्रयत्न करू नये.असे स्पष्ट प्रतिपादन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत केले.
पोलीस ठाणे मध्ये येणाऱ्या व्यक्तींनी व्हिडीओ रेकॉर्डींग केल्यास गुन्हा नोंद करता येत नाही, असे मा. न्यायालयाने आदेशीत केलेले आहे. तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी मा. न्यायालयाचे आदेशाची प्रत सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार यांना वितरीत करून सदरची बाबही त्यांच्या निदर्शनास आणुन द्यावी. तसेच अधिकृत गुपिते (ऑफिशियल सिक्रेट्स) कायदा १९२३ अन्वये गुन्हा नोंद करतांना मा. न्यायालयाचे आदेशाचे तंतोतंत पालन करावे. असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक दि.१३ जून २०२३ रोजी नागपूर शहरच्या पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी काढले आहे.