वणी शहरातील रस्त्याची दुरावस्था
रोजच छोटे मोठे अपघात ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
शासनालाच लक्ष देण्याची गरज
सुरेंद्र इखारे वणी :- शहरातील टिळक चौकापासून तर दीपक टॉकीज चौका पर्यंतच्या हैद्राबाद राज्यमार्गाची तसेच गांधीचौका पासून तर बायपास पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक,पायदळ चालणारे तसेच शाळकरी विद्यार्थी याची नियमित ये जा असल्याने छोटे मोठे अपघात होऊन व्यंगत्व आले आहे तसेच पायी चालणाऱ्यांचे व वाहतूक करणाऱ्याचे हाल होत आहे. या रस्त्याची पार वाट लागून गेली आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रात्रीला ये जा करताना रस्ता आहे की खड्डा आहे हे दिसत नसल्याने अनेकांचा अपघात होऊन इजा झाली आहे. या रस्त्यावरून ये जा करणार्यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे. आता तर पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे तसेच मोटरसायकल व इतरही वाहनांचे नुकसान होत आहे. पाणी साचून राहत असल्याने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेकदा शहरवासीयांनी नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते परंतु त्यांनी सांगितले या दोन्ही रस्त्याचा निधी मंजूर झाला असून आता लवकरच कामाला सुरुवात होणार आहे असे आश्वासित केले परंतु अजून पर्यंत रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही तेव्हा शासनाने व बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी वणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.