ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा – गजानन कासावार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सुरेंद्र इखारे वणी:-
या देशाला देशाचा प्रथम विचार करणाऱ्या देशभक्त युवकांची आवश्यकता आहे. प्रत्येक युवकाने आपला शैक्षणिक पाया मजबूत केला पाहिजे. त्यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे लागेल. त्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी दिवसरात्र एक करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरच यश मिळते. त्यासाठी शिक्षणासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे सारख्या संघटनेच्या माध्यमातून स्वतःला घडविल्यास आपले जीवन यशस्वी होईल असा आशावाद अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी व्यक्त केला. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोहत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
वसंत जिनिंगच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून येथील वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे उपस्थित होते. त्यासोबत व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वणी शाखा अध्यक्ष वैभव दहेकर, नगर मंत्री नीरज चौधरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वैभव दहेकर म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील एकमेव विशाल अशी विद्यार्थ्यांची संघटना आहे. या संघटनेची स्थापना 9 जुलै 1949 रोजी झाली आहे. युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, देशभक्त तरुणांची फळी निर्माण व्हावी. यासाठी सतत कार्यशील असणाऱ्या या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वावलंबी आत्मनिर्भर तयार होतो. त्यामुळे मागील 75 वर्षांपासून ही संघटना यशस्वीपणे कार्यरत आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त वणी नगरातील सर्व शाळेतील 10 वी व 12वी च्या 120 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषी काकडे यांनी केले. आभार प्रदर्शन नीरज चौधरी यांनी केले.