मराठी माध्यमातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
– आ. बोदकुरवार
* शाळा क्र. 7 चे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र
सुरेन्द्र इखारे वणी:-
आपल्या देशातील पालकांना आपली मुलं खूप शिकली पाहिजे, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जागरूक आहेत. शिक्षण तज्ज्ञांच्या मते मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे प्रभावी व दीर्घकाळ परिणाम करणारे राहते. मराठी भाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी यशाची शिखरे गाठत आहेत. मराठी माध्यमातून घेतलेल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. असे प्रतिपादन वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. ते येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्र. 7 मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोहत बोलत होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस हे होते. त्यासोबत व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा योगिता निंबाळकर, मुख्याध्यापक गजानन कासावार हे उपस्थित होते.
नगर परिषद शाळा क्र. 7 मधील अनुज विजय चव्हाण व अदिती अमोल झाडे हे दोन विद्यार्थी पाचव्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झलकल्यामुळे त्यांचा आ. बोदकुरवार व मुख्याधिकारी वायकोस यांच्या हस्ते गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबत या वर्षी या शाळेत 7 व्या वर्गापर्यंत शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तपस्या सारवे, एकता देसाई, रिद्धीमा निंबाळकर यांचा सुद्धा अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. यातील तपस्या सारवे या विद्यार्थिनीने वणीत राहून नीट परीक्षेत 720 पैकी 645 गुण मिळविल्यामुळे शाळा क्र. 7 मधील शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उत्तम असल्याची ग्वाही उपस्थित अतिथींनी व पालकांनी दिली.
या प्रसंगी आ. बोदकुरवार यांचा शाळेतर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचा शाळेतर्फे आ. बोदकुरवार यांनी शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला. या शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झलकलेल्या वर्गाचे वर्गशिक्षक विजय चव्हाण यांचा सुद्धा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबत या पाचही गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी या शाळेतील मूख्याध्यापक व शिक्षकवृंदाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या परिश्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन कासावार यांनी केले. सूत्रसंचालन मंगला पेंदोर यांनी केले. आभारप्रदर्शन चंदू परेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी कल्पना मुंजेकर, शुभांगी वैद्य, दिगंबर ठाकरे यांनी परिश्रम केले.