तथागत बुद्ध विहारात अण्णाभाऊ साठे जयंती व श्रावण पोर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात
नागपूर जयंत साठे :- काशीनगर स्थित तथागत बुद्ध विहार येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा व श्रावण पोर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड.सचिन मेकाले तर प्रमुख अतिथी म्हणुन इंजि. प्रकाश भौतमांगे, नरेश पाटील व सुभाष बोंदाडे यांची उपस्थिती होती.
नरेश पाटील यांनी श्रावण पोर्णिमेला घडलेल्या प्रमुख घटनांवर विस्ताराने प्रकाश टाकला.श्रावण पोर्णिमेच्या संदर्भात प्रामुख्याने तीन घटना बौद्ध जगतात अत्यंत महत्वाच्या आहेत.त्यात अंगुलीमालाची दीक्षा, अनाथ- पिंडकाने 160 सुत्त मुखोद्गत सांगितले व बौद्ध धम्माची पहिली विश्वसंगिती होय.
त्यानंतर प्रकाश भौतमागे यांनी शील पालन केल्यामुळे पाच प्रकारचे लाभ कसे होतात हे समजाऊन सांगितले. धम्माचे गाढे अभ्यासक सुभाष बोंदाडे यांनी आपल्याकडे श्रद्धा आणि प्रज्ञा नसेल तर मानवाचे नुकसान कसे होते हे सविस्तर पणे उदाहरणे देऊन स्पष्ट केले.अॅड.सचिन मेकाले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर विस्तृत प्रकाश टाकला. ते म्हणाले की, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जीवंतपणी उपेक्षा तर झालीच परंतू आजही ती होत आहे. अण्णाभाऊंनी श्रमिकांच्या वेदना व संघर्षाने प्रभावीत होऊन त्यांनी आपले विचार लिहायला सुरुवात केली. कथा कादंबऱ्या, कवन, पोवाडे, नाटके, गाणे, वगनाट्ये लावणी इत्यादीच्या लिखाणामुळे ते लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध पावले. जीवनाच्या वास्तविकतेला मानवी संवेदनांचा स्पर्श करून सशक्त साहित्य निर्मिती अण्णाभाऊ साठेंनी केली. अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले याचा अर्थ त्यांनी शिक्षण न घेता अनेक कादंबऱ्या लिहून उपेक्षितांचा जीवन संघर्ष जगासमोर मांडला. जगभरातील २७ भाषेत त्यांचे साहित्य प्रकाशित झाले. रशियाने त्यांचा यशोचित सन्मान केला. त्यांनी लिहिलेले साहित्य अनेक विद्यापीठांमध्ये शिकविल्या जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सुधाकर स्थूल यांनी केले. आभार प्रदर्शन नानाजी ढेंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमूद गाणार सिंधू स्थूल, रेखा मून, नंदा शेंडे, संघमित्रा मानवटकर, आशा गोंडाणे, सुजाता वाघमारे, संगिता बनसोड, माला नरांजे, आदित्य लखोटे, मनोज कांबळे, अभिलास ढाकणे, अक्षय रंगारी, जया ढेंगरे, पंचशीला बनकर, अरविंद पाटील, रेखा मून, लता गारसे इत्यादिनी सहकार्य केले.