प्रा डॉ. स्वानंद पुंड यांच्या अविरत प्रकाशनाद्वारे ६८ व्या ग्रंथाचे प्रकाशन
सुरेन्द्र इखारे वणी :- श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत लोकप्रिय लेख मालिका नवविधा भक्ती मोरयाची ! आज ग्रंथरूपात प्रकाशित होत आहे .
गाणपत्य संप्रदायाचे अभ्यासक, प्रचारक आणि उपासक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी लिहिलेली ही लेख मालिका संप्रदायाचा सर्वोच्च ग्रंथ असणाऱ्या श्री मुद्गल पुराणाच्या पहिल्या खंडातील बाविसाव्या अध्यायात आलेल्या भगवान श्री गणेश तथा श्री मुद्गलाचार्य यांच्या संवादावर आधारित होती.
भक्तीचे नऊ प्रकार कोणते? या प्रकारांचा तोच क्रम का आहे? त्या प्रत्येक प्रकाराचे स्वरूप, रहस्य काय ? भगवंताला अपेक्षित असणारी भक्ती कोणती? त्या भक्तीचे सर्वोच्च अधिकारी कोण? त्यांनाच त्या भक्तीचे सर्वोच्च अधिकारी का म्हटले आहे ? अशा विविध अंगाने प्रस्तुत मालिकेत या विषयाचे सांगोपांग चिंतन करण्यात आलेले आहे.
जळगाव येथील श्री जयंत कुलकर्णी संचालित अविरत प्रकाशनाच्या द्वारे प्रकाशित होत असल्याने या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. स्वानंद पुंड यांची ग्रंथ प्रकाशन संख्या ६८ वर पोहोचत आहे हे विशेष उल्लेखनीय.
केवळ श्री गणेश भक्तच नव्हे तर कोणत्याही देवतेच्या भक्ताला भक्तीचे नेमके स्वरूप समजून सांगणारा हा ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा.
६४ पृष्ठाच्या या ग्रंथाचे मूल्य ७० रूपये ( अधिक टपाल खर्च) असून प्राप्तीसाठी 9028868953 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन अविरत प्रकाशनाच्या द्वारे करण्यात येत आहे.