Sunday, October 6, 2024
Google search engine
HomeUncategorizedआपल्या उपास्य तत्त्वावर अढळ श्रद्धा हवी - ह.भ.प. रवींद्र साधू

आपल्या उपास्य तत्त्वावर अढळ श्रद्धा हवी – ह.भ.प. रवींद्र साधू

आपल्या उपास्य तत्त्वावर अढळ श्रद्धा हवी – ह.भ.प. रवींद्र साधू

सुरेंद्र इखारे वणी :- “आपले उपास्य तत्त्व मग ते कोणते दैवत असेल किंवा स्वधर्म स्वराष्ट्र असेल त्यावर परिपूर्ण निष्ठावंत भाव असणे हेच भक्ताचे खरे लक्षण आहे. जगात कसेही वागले तरी लोक नावे ठेवतातच. त्याचा विचार न करता आपण स्वीकारलेल्या पंथावर कार्यावर आपली परिपूर्ण अविचल निष्ठा असणे हेच जीवन साफल्याचे रहस्य आहे.” असे निरूपण सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रा. रवींद्र साधू यांनी केले.
जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्र उत्सवात पहिली माळ गुंफतांना ते जगद्गुरु तुकोबारायांच्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये ! या अभंगावर निरूपण करीत होते.
देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी प्रास्ताविक केल्यानंतर सुनील इंदूवामन ठाकरे यांनी कीर्तनकारांचा लौकिक परिचय करून दिला.
सैनिक, क्रांतिकारी यांच्यासाठी त्यांचा देशच त्यांचा देव असतो. पुंडलिका समान भक्तासाठी माता-पिता हेच देव असतात. सामान्य माणसासाठी त्याचे कर्तव्य हाच त्याचा देव आहे. अशा देवांवर अखंड श्रद्धा, आणि निर्धार पूर्वक त्याची उपासना हेच वर्म असल्याचे जगद्गुरु तुकोबांनी कसे सांगितले ते त्यांनी भक्त पुंडलिकाच्या, कुक्कुट ऋषींच्या कथेवरून उलगडून दाखविले.
पूर्वरंगानंतर बुवाजी आसुटकर यांनी देवस्थानच्या वतीने कीर्तनकारांचा सत्कार केला. याप्रसंगी सौरभ साधू यांनी माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया येई, सेवा मानून घे आई ! हे गीत सादर केले.
उत्तर रंगात प्रा. रवींद्र साधू यांनी,जगन्नाथ पुरी येथील लाखा कोल्हाट्याची सुप्रसिद्ध कथा सांगत त्याच्या भक्तीने आई रुक्मिणी त्याच्या चंद्रा नामक मुलीच्या रूपात तर भगवान जगन्नाथ ढोलकी वादक रूपात प्रकट झाले हेच निश्चल भक्तीचे रहस्य आहे हे सुस्पष्ट केले.
कीर्तन सेवेत संवादिनी ची साथ श्री अरुण कुमार दिवे यांनी तर तबला साथसंगत अभिलाष राजूरकर यांनी केली. शेवटी देवस्थानचे विश्वस्त श्री किशोर साठे यांच्या हस्ते आरती संपन्न करण्यात आली.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments