महाराष्ट्रात बसपाच्या चार सभा
नागपूर जयंत साठे – बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती जी या डिसेंबरमध्ये नागपुरात येतील. त्यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून बसपाचे केंद्रीय कॉर्डिनेटर व युवा आयकॉन आकाश आनंद यांच्या महाराष्ट्रातील 17 नोव्हेंबर ला नागपूर (विदर्भ), 23 नोव्हेंबरला पुणे (खान्देश), 29 नोव्हेंबर ला औरंगाबाद (मराठवाडा) व 6 डिसेंबरला मुंबईत (खानदेश) आदि चार ठिकाणी सभा होणार आहेत.
हल्ली बहन मायावती जी व आकाश आनंद मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगाना येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बिझी आहेत. परंतु 2024 च्या लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा नजरेसमोर ठेवून त्यांनी आपल्या व आकाश आनंद यांच्या सभांची आखणी केलेली आहे.
या सभा यशस्वी करण्यासाठी बसपाची प्रदेश, जिल्हा, विधानसभा, कार्यकारिणी कामाला लागलेली आहे. दोन दिवसापूर्वी डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आकाश आनंद यांच्या विदर्भाच्या नागपुरातील सुरेश भट सभागृहात होणाऱ्या 17 नोव्हेंबरच्या सभेच्या पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून प्रदेश, जिल्हा, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित झाले होते. बसपाचे केंद्रीय कॉर्डिनेटर व महाराष्ट्र प्रदेश चे मुख्य प्रभारी डॉक्टर अशोक सिद्धार्थ यांच्या दिशा निर्देशानुसार यावेळी प्रामुख्याने केंद्रीय समन्वयक नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी व विदर्भाचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे तसेच महाराष्ट्र प्रदेशचे युवा प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने यांनी प्रामुख्याने कार्यकर्त्यांना निर्देश दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे नागोराव जयकर, नानाजी देवगडे, पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, जिल्हा प्रभारी एड राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष ओपुल तामगडे प्रामुख्याने उपस्थित होते.