पाली विभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर कालवश
जयंत साठे नागपूर :- पाली विभूषण डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालेले आहे. पाली भाषेच्या विकासाकरिता त्यांचे योगदान अमूल्य आहे. ते पीडब्ल्यूएस महाविद्यालय, कामठी रोड, नागपूर येथून पाली प्राकृत विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून 2003 साली सेवानिवृत्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत बोर्ड ऑफ स्टडीजचे सलग चार वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत.
यूपीएससी मध्ये पाली विषय पुन्हा सुरू करण्यात यावा, पाली विद्यापीठ नागपूर येथे स्थापण करण्यात यावे, महाराष्ट्रात पाली अकादमी स्थापन करण्यात यावी, राज्यघटनेच्या शेड्युल आठ मध्ये पाली भाषेचा समावेश करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी ते न्यायालयीन लढाई लढत होते. त्याकरिता त्यांनी ऍड. शैलेश नारनवरे यांच्या मदतीने न्यायालयीन लढा सुरू ठेवलेला होता. नागपूर विद्यापीठात बी. एड. ला पाली ही मेथड सुरू करण्यासाठी, बी.कॉम. ला पाली हा विषय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सरांच्या प्रयत्नामुळेच नागपूर विद्यापीठात बुद्धिस्ट स्टडीज हा विषय सुरू करण्यात आला.
पाली भाषेच्या प्रसाराकरिता जापान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार आदी बौद्ध देशांना भेटी देऊन बुद्ध विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पवनी येथील महासमाधीभूमी स्तूपाच्या निर्मितीच्या कार्यात समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी योगदान दिलेले आहे. अनेक पाली भाषा परिषदांचे त्यांनी आयोजन केलेले आहे. बौद्ध साहित्य संमेलन आयोजित केलेले आहेत. पाली भाषेकरिता सतत मोर्चे आणि आंदोलन निर्माण करून जनमानस जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे अध्यक्षपदी कार्य करून तरुणांना बौद्ध धम्माच्या वाटेवर घेऊन जाण्याचा सदोदित प्रयत्न केलेला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, तसेच सेमिनार मध्ये शोधनिबंध वाचून आपले योगदान दिलेले आहे. अनेक विद्यापीठांच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे ते सदस्य म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांनी त्यांना पालीविभूषण ही मानद उपाधी देऊन सन्मानित केलेले आहे. पाली जीवन गौरव पुरस्कार, विजय रत्न पुरस्कार आदि विविध प्रकारचे सन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. पाली भाषेकरिता संघर्ष करणारे डॉ. बालचंद्र खांडेकर आज अनंतात विलीन झाले. त्यांचे अंतिम संस्कार उद्या दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी वैशाली घाटावर दुपारी 12.00 वाजता करण्यात येईल. त्यांची प्रेतयात्रा प्लॉट नंबर 152, मेत्ता, लघुवेतन कॉलनी, नागपूर येथून काढण्यात येणार आहे. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत मा. ताराचंद्र खांडेकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि फार मोठा आप्तपरिवार आहे.