राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पंचरंगी यश.
सुरेंद्र इखारे वणी :- शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सोबतच अन्य विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त करीत त्यांच्यात राष्ट्रीयतेची आणि सेवेची भावना रुजवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वारे विद्यार्थ्यांच्या विविधांगी विकासासाठी महाविद्यालयापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक उपक्रम राबविले जातात.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अशा विविध क्षेत्रात विद्यापीठाचे परीक्षेत ओलांडून प्राप्त केलेले यश हा त्यांच्या व्यक्तिगत आनंदा इतकाच महाविद्यालयाचाही निश्चितच खूप अभिमानाचा विषय आहे.
आपत्ती व्यवस्थापन या विषयात गोंडवाना विद्यापीठाद्वारे आयोजित आव्हान २०२४ या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे अंकुश झाडे आणि संजना देवगडे यांची निवड झाली आहे.
गणतंत्र दिनाच्या दिवशी होणाऱ्या पथसंचलनात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी होत असतात. यावर्षी अनुष्का नक्षीने हिची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पथसंचलनात निवड झाली आहे.
गणतंत्र दिनाच्या पूर्व नियोजनात पश्चिम क्षेत्राकरिता के एल विद्यापीठ आंध्र प्रदेश द्वारा आयोजित संचलन शिबिरामध्ये अस्मिता वाळके हिची निवड झाली आहे.
त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय साहसी शिबिरामध्ये किरण चव्हाण हिची निवड हा वैशिष्ट्यपूर्ण गौरव आहे.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे तथा डॉ. विकास जुनगरी यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे पंचरंगी यश महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाचा विषय आहे असे म्हणत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे सत्कारपूर्वक कौतुक केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार यांच्यासह सर्व संचालक गण तथा महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.