रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुरेंद्र इखारे वणी :– कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व मा. वामनरावजी कासावार संचालक, शेतकरी शिक्षण संस्था, मारेगाव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 23 जानेवारीला रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले करिता प्राचार्य सरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आणि यापुढे जेव्हा जेव्हा रक्ताची गरज भासेल त्यावेळेस महाविद्यालय शिबीर आयोजित करण्यास सदैव तत्पर राहील असा मनास व्यक्त केला. रक्तसंकलनाकरिता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नितेश राऊत व महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक व शिक्षेकत्तर कर्मचारी तसेच रासेयो विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.