▫️शेतकरी कामगारांचे नेते कामरेड शंकरराव दानव यांची प्रकृती खालावली परंतु स्थिर
,▫️ चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
_______________________
सुरेंद्र इखारे वणी : – यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव ह्यांना दि. २७ ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सध्या व्हेंटिलेटर वर ठेवले आहे. परंतु तब्येत स्थिर असून तब्येत सुधारण्याची आशा केल्या जात आहे. इस्पितळात त्यांची मुले ॲड. राहुल, मिलिंद व सारिका तसेच पक्षाचे कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदू बोबडे, मनीषा परचाके त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
कॉम शंकरराव दानव ह्यांची संपूर्ण हयात शेतकरी,शेतमजूर, कामगार, दलीत, आदिवासी, महिला, विद्यार्थी व युवक ह्यांचा हक्कासाठी संघर्ष करण्यात गेली. वयाचा १५ व्या वर्षापासून स्वतःला चळवळीत झोकून दिले असून त्यांनी चालविलेल्या संघर्षातून अनेकांना चांगले जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात वन जमीन कसनाऱ्यांचे आंदोलन चालवून हजारो शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळाली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. बांधकाम कामगारांचे संघटन बांधून त्यांना सुद्धा न्याय मिळवून दिले. प्रत्येक क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्षात राहिल्याने जिल्ह्यात त्यांना बहुमान आहे. गेल्या ६० वर्षापासून चळवळीत राहिल्याने त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले तसेच त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा करण्यात आले होते. असे हे लोकनायक कामरेड शंकरराव दानव ह्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस करीत लवकर बरे होण्याची कामना व्यक्त केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ. अजित नवले, किसन गुजर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, सिटू कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड हे सातत्याने विचारपूस करीत ते लक्ष ठेऊन आहेत. काम्रेड दानव आय सी यू मध्ये असल्याने त्यांना सर्व कार्यकर्त्यांना भेटता येऊ शकतं नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना इस्पितळात येण्यापासून थांबविण्याची सूचना करण्यात आली आहे. असे असले तरीही आशा व गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सिटु संघटनेचा अनेक कार्यकर्त्या प्रामुख्याने उषा मुरके व प्रीति करमनकर यांचे समवेत तसेच मेटिखेडा येथील पक्षाचे अनेक कार्यकर्ते चंद्रपूर कडे येत आहेत. ह्यांना फक्त आपला प्रिय काम्रेड ह्यांना पाहायचे आहे व ते लवकर बरे व्हावे अशी कामना आहे.