लोकमान्य टिळक महाविद्यालयात वैश्विक मानवी मूल्यांवर कार्यशाळा.
सुरेंद्र इखारे वणी :- ” चांगल्या समाजाच्या आणि उत्तम देशाच्या निर्मितीसाठी केवळ भौतिक ज्ञानाचा अभ्यास पुरेसा नसून उच्चतम मानवी मूल्यांचा संस्कार अत्यंत आवश्यक आहे. मानवी जीवनात पैशाला फार महत्त्वाचे स्थान असले तरी सुखी आणि समाधानी व्यक्तिमत्व केवळ पैशाच्या आधारावर तयार होत नाही. योग्य समज आणि योग्य भावना यांचा विकास करण्यासाठी वैश्विक मानवी मूल्य अनिवार्य असल्यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या विषयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे.” असे प्रतिपादन अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप ताटेवार यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाद्वारे (IQAC) आयोजित कार्यशाळेत वैश्विक मानवी मूल्ये या विषयावर ते अभिव्यक्त होत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे विराजमान होते.
अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे संयोजक डॉ. करमसिंग राजपूत यांनी प्रास्ताविकामध्ये या विषयाचे महत्व अधोरेखित करीत विविध अभ्यासक्रमांमध्ये त्याची अनिवार्यता विशद केली.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावशाली सादरीकरणात डॉ. संदीप ताटेवार यांनी जीवनात सकारात्मक विचारांनीच मनुष्य यशाचे शिखर गाठू शकतो तर नकारात्मक विचार त्याचे स्वतःचे जीवन देखील नष्ट करते हे सांगत परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी वैश्विक मानवी मूल्यांचे महत्त्व विविध उदाहरणांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी दैनंदिन जीवनात स्वतःच्या आणि संपर्कातील प्रत्येकाच्या आनंदासाठी मानवी मूल्यांची आवश्यकता प्रतिपादन करीत विविध मूल्यांचे संस्कार कसे अनिवार्य आहेत यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे संयोजक डॉ करमसिंग राजपूत यांनी तर आभारप्रदर्शन वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. हेमंत मालेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.परेश पटेल ,नितेश चामाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.