चक्रधर स्वामींचा लीळा चरित्र हा ग्रंथ क्रांतिकारी आहे – प्रा दिलीप अलोने
सुरेन्द्र इखारे वणी:- माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेचे 32 वे पुष्प गुंफताना अध्यक्षीय भाषणात प्रा दिलीप अलोने महानुभाव पंथीय स्त्री दर्शन या विषयावर विचार व्यक्त करताना म्हणाले की, चक्रधर स्वामींचा लीळा चरित्र हा ग्रंथ क्रांतिकारी आहे. त्यांनी आपल्या जीवनात स्त्रियांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे मत व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेचे 32 वे पुष्प महानुभाव पंथीय स्त्री दर्शन या विषयावर नगर वाचनालायत आयोजित केला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे हे होते. अतिथी वसुुुधा ढाकणे तर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार हे होते.
यावेळी प्रमुख वक्त्या वसुधा ढाकणे विषय मांडताना म्हणाल्या स्त्रीची निर्मिती ही निसर्गाने कोमलतेत केली आहे. पण प्रसंगी ती रणचण्डिका होऊ शकते हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे. ती स्वयं सिद्ध असते. हे महानुभाव पंथातील महदंबा या विदुषीने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. तिने महानुभाव पंथाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पुढे गेली होती. असे विचार महानुभाव पंथाच्या अभ्यासिका वसुधा ढाकणे यांनी व्यक्त केले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मनातील घाण कमी करण्यासाठी अध्यात्मिक वारसा आपल्या संतांनी दिला. त्यात महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांचा वाटा मोठा आहे. मराठीतील त्यांचा आद्य ग्रंथ लीळा चरित्र हा आहे. चक्रधर स्वामींनी आपल्या जीवनात स्त्री- पुरुष यांच्या निर्विकार मैत्रीचे सुंदर उदाहरण त्यांनी आपल्या जीवनातून घालून दिले. स्त्री मनाचं दुःख व समस्या मांडून समाजाला दूष देण्याचे काम चक्रधर स्वामींच्या शिष्या महदंबा यांनी केले. चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रातून मराठीला आद्य कवयित्री मिळाली. एका स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने महानुभाव पंथाला वाचविले अस प्रतिपादन केले.
या व्याख्यानाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे कार्यकारिणी सदस्य गजानन भगत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय गजानन कासावार यांनी करून दिला. सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य अशोक सोनटक्के यांनी केले. आभार प्रदर्शन शाखा सचिव अभिजीत अणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, सुनिता राठोड यांनी परिश्रम घेतले.