सत्पुरुष खरा शिल्पकार
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे !!
सुरेंद्र इखारे वणी :- भगवतगीतेत भगवान श्रीकृष्णांनी अभिवचन दिले आहे कि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे !! अर्थात ” सुष्टांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नायनाट करण्यासाठी आणि धर्माची तत्वे पुन्हा स्थापित करण्यासठी मी युगानयुगे या पृथ्वीवर प्रगट होतो.”
आजच्या युगात खऱ्या अर्थाने ईश्वरी अवतार कोण? तर याच समाजात वावरणारे, पण भगवत चरणी सदैव लीन असलेले अधिकारी पुरुष अर्थात संत, महात्मे. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ह्याच भूमीत आम्ही अनुभवलेले आमचे सद्गुरू प. पु. श्री डी. पी. कुलकर्णी उर्फ दत्ताकाका प्रेमाने सगळे त्यांना दत्ताकाका म्हणून संबोधायचे. दत्ताकाकांचा जन्म दिनांक १० जुलै १९४२ साली झाला असून १७ मे २०१२ रोजी त्यांनी ह्या नश्वरदेह पंचतत्वात विलीन केला. कलकत्ता येथून LIC मध्ये झोनल व्यवस्थापक ह्या पदावरून सेवानिवृत्त झालेत. त्यांनी त्याचं सबंध आयुष्य हे आमच्यासारखा प्रपंचीकाला प्रपंचात राहून परमार्थ कसा साधायचा हे प. पु. सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराच्या शिकवणुकीच्या आधारे समाजातील सर्व स्तरांतील जानमानसापर्यंत पोहोचविण्याकरिता समर्पित केले. दत्ताकाकांची खुबी म्हणजे ते गोष्टीरूपाने नामाचे महत्व पटवून हसत खेळत नकळत नामबीज सगळ्यांच्या अंतः करणात पेरून देत. त्यांनी अदबोधन केलेला एक प्रसंग सांगावासा वाटतो.
भगवतगीता सांगतांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात “अर्जुना तू ज्ञानी असशील तर समाधानात रहा आणि तसा नसशील तर मुकाट्याने ऐकून घे.” आपण सत्पुरुषांकडे गेल्यावर आपणच आपले गाऱ्हाणे त्यांना सांगतो. त्यांनी त्यावर काही मार्ग सांगितल्यास त्याचे निमुटपणे पालन न करता त्यावर विनाकारण चर्चा करतो. आपण निमुटपणे ऐकतो पण कृती मात्र विकल्परहित होणे म्हणजे निमुटपणे ऐकणे होय. म्हणजेच भगवंताच्या, आपल्या सद्गुरूंच्या ठायी समर्पण होय. हे सांगतांना प.पू. दत्ताकाका एका सत्पुरुषाने सांगितलेली गोष्ट सांगत एक शिल्पकार असतो, तो आपल्या कार्यशाळेत जात असला वाटेने त्याला दोन चांगले दगड दिसतात. दोन्ही दगड उचलून तो कार्यशाळेत आणतो.
उन्नी, हातोडी घेऊन शिल्पकार दगडाजवळ जातो. एक दगड म्हणतो मला घडवा व दुसरा म्हणतो मला सोडून द्या. ज्या दगडाची टाकीचे घाव सोसायची तयारी असते त्यातून एक सुंदर हनुमंताची मूर्ती तयार होते. पुढे त्याची प्राणप्रतिष्ठा होऊन हार, फळे, नारळ आणून लोक त्याची पूजा करु लागतात. ज्या दगडाने त्याला नाही म्हटले त्याला पश्चाताप होतो, तो शिल्पकाराला म्हणतो मला पण वापरा. शिल्पकार म्हणतो ठीक आहे. तुझा वापर व्हावा एवढीच तुझी इच्छा आहे नं? ती पूर्ण होईल. पुढे त्या दगडाला नीट आकार देऊन हनुमंताच्या पायाशी ठेवतात. हनुमंताला नारळ अर्पण करण्याकरिता ते फोडण्यासाठी त्याचा वापर व्हायला लागतो.
ही गोष्ट सांगून ते सत्पुरुष म्हणाले” तो शिल्पकार भाग्यवान होता, कारण घडवीत असलेल्या मुर्तीचा दगड आदल्या दिवशी जेवढे काम झाले त्याच स्थितीत थांबायचा दुसऱ्या दिवशी त्याच्या स्थितीत बदल झालेला नसे. इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. काळ भेटलेला माणूस आज भेटेपर्यंत परत मूळ स्वभावाकडे गेलेला असतो. माणसापेक्षा दगड बरा म्हणायची वेळ आली आहे. खरं कि नाही? सत्पुरुष खरा शिल्पकार असतो. जो माणसांच्या विचारला, बुद्धीला, विकारांना, कृतीला दिशा देऊन प्रगती करतो. आपला आनंद कसा टिकेल ह्याचे शास्त्र गिरवून घेतो. पण होते कसे की आपण दर वेळेला आपल्या प्रापंचिक अडचणी आणि गाऱ्हाणे घेऊन जातो. त्यामुळे आपली प्रगती खुंडते. ज्यात आपले हित आहे, शाश्वत आनंदाची प्राप्ती आहे असेच मार्गदर्शन सत्पुरुष, आपले सदगुरु करतात. त्यामुळे त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेले साधन निष्ठेने आणि नियमित करणे ह्याशिवाय अन्य कोणत्याही खटाटोपाच्या भानगडीत पडू नये.