लोकमान्य टिळक महाविद्यालयात महाकवी कालिदास दिन संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- आषाढस्य प्रथमदिवसे.. ! या मेघादूतातील वर्णनाच्या आधारे आषाढ महिन्याची शुद्ध प्रतिपदा महाकवी कालिदास दिन स्वरूपात साजरी केली जाते. शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाद्वारे आज महाविद्यालयात कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमातील विशेष आमंत्रित ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाद्वारे चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा गौरव करीत, साहित्य विश्वातील महाकवी कालिदासांच्या अलौकिक योगदानाला वंदन केले. परंपरागत विषय म्हणविल्या जाणाऱ्या संस्कृत विषयाच्या आपल्या महाविद्यालयातील विभागाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्वरूपात संचालित गीर्वाण वाणी यूट्यूब चैनल च्या माध्यमातून जगभरातील संस्कृत प्रेमी संस्कृत साहित्याचा रसास्वाद घेत आहेत ही महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा शब्दात विशेष आनंद व्यक्त केला.
त्यानंतर संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड यांनी महाकवी कालिदासांच्या जीवनातील विविध प्रसंग, दंतकथा आणि त्यांच्या साहित्यकृतीचा अल्प परिचय या स्वरूपात विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा गौरी हिने संस्कृत माध्यमातून केले तर आभार प्रदर्शन धनश्री तेलंग हिने केले. महाविद्यालयाचे कर्मचारी जयंत त्रिवेदी, कार्तिक देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.