लोकमान्य टिळक महाविद्यालयात दीक्षारंभचे आयोजन
सुरेंद्र इखारे वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या निर्देशित सूचनानुसार बी.ए., बी.कॉम. बी.एससी. या विद्या शाखांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आणि विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांबद्दल सविस्तर आणि अधिकृत माहिती व्हावी यासाठी, शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १० जुलै २०२४ रोजी उद्घाटन सत्रात नवीन शैक्षणिक धोरण २०२० आणि विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. प्रसाद अ. खानझोडे हे विद्यार्थ्यांचे उद्बोधन करतील.
चार दिवस चालणाऱ्या या उपक्रमात”ओळख ग्रंथालयाची” या विषयावर महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे,
विद्यार्थी विकास विभागामार्फत चालणारे कार्यक्रम या विषयावर विभागाचे संयोजक डॉ. अभिजित अणे, राष्ट्रीय छात्र सेना या विषयावर प्रा. किशन घोगरे, राष्ट्रीय सेवा योजनेतील उपक्रम यावर डॉ. निलिमा दवने ,
क्रीडा विभागातील सुसंधींबाबत
महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. उमेश व्यास तथा विद्यार्थी जीवनात योगाचे महत्व या विषयावर महाविद्यालयात योगशास्त्राचे वर्ग घेणारे डॉ. गजानन अघळते हे मान्यवर उद्बोधन करणार आहेत.
महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम. बी.एससी. या सर्व विद्या शाखांमध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दीक्षारंभ उपक्रमाचे समन्वयक डॉ. करमसिंग राजपूत यांनी केले आहे.