संगीताशिवाय मानवी जीवन अपूर्ण—डॉ.ऐश्वर्या अलोणे
मानवी जीवनासाठी संगीत प्रभावी औषध
सुरेंद्र इखारे वणी – चार वेदांपैकी सामवेद ऋचांच्या गायनापासून सुरू झालेला संगीताचा प्रवास हा निव्वळ अवर्णनीय आहे,सारंगदेवांच्या संगीत रत्नाकर या ग्रंथापासून खर तर भारतीय शास्त्रीय संगीताची सुरूवात झाली आहे. संगीताशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. असे विचार डाॅ ऐश्वर्या अलोणे यांनी विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय तर्फै आयोजित माझ गांव माझा वक्ता या व्याख्यान श्रृंखलेच्या पस्तीसाव्या पुष्पाच्या प्रसंगी व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर विसासंघ अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे ,कार्याध्यक्ष मा. माधवराव सरपटवार,सचिव डॉ.अभिजित अणे उपस्थित होते.
सप्तसुरांना प्रथम वंदन करून, जी मुळात स्वस्थ बसु देत नाही ती कला अशी कलेची व्याख्या त्यांनी केली. मानवी जीवनातील वात, पित्त व कफ या त्रिदोषांवर संगीत अत्यंत प्रभावी असं औषध आहे असं आयुर्वेदातील वैद्य या नात्याने त्यांनी अधिकारवाणीने सांगीतले. 1945 मध्ये अमेरीकेमध्ये सुरू झालेल्या म्युझिक थेरपी ने मानवी विकारांवर आजपर्यंत प्रभावीपणे मात केली आहे याची उपस्थित श्रोत्यांना त्यांनी माहिती दिली. सकाळी गायली जाणारी भूपाळी असो की सायंकाळी उत्साह निर्माण करणारा यमन राग असो आपल्या सुरेल आवाजाने गाऊन डॉ.ऐश्वर्या अलोणे यानी उपस्थित प्रेक्षकांना रिझविले. मानवी जीवनातील तणावासाठी गायला जाणारा कलावती रागातील प्रथम तुझं पाहता असो की आम्लपित्तासाठी उपचार म्हणून गायलं जाणारं जीवलगा राहिले रे दूर घरं माझे हे गाणं गाऊन आयुर्वेद व संगीतावर असलेल्या आपल्या प्रभुत्वाची प्रचिती ऐश्वर्या अलोणे यांनी उपस्थितांना दिली.
या प्रसंगी मा माधवराव सरपटवार यांनी प्रास्ताविकातून नवोदितांना संधी देणाऱ्या माझ गांव माझा वक्ता या श्रृंखलेचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ.दिलीप अलोणे यांनी डॉ.ऐश्वर्या यांचे पहिल्यावहिल्या व्याख्यान बद्दल अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गंधेवार सरांच्या गायनानंतर विसासंघ वणी शाखेतर्फै डॉ.ऐश्वर्या अलोणे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोकराव सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे व राम मेंगावार यांनी विशेष परिश्रम घेतले. वणीकरांची लक्षणीय उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.