“व्यवस्थापनसूत्राणि” पुस्तकाचे माननीय कुलगुरूंच्या हस्ते विमोचन
सुरेंद्र इखारे वणी – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ज्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी शिक्षण क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात येत आहेत त्यातली एक म्हणजे सामान्य मुक्त निवड अभ्यासक्रम. जीओईसी या नावाने प्रचलित असणाऱ्या या अभ्यासक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या विद्याशाखे शिवाय अन्य विद्याशाखेतील अभ्यासक्रम निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात असे असले तरी त्यांच्या स्वीकृत विद्याशाखे व्यतिरिक्त एकदमच वेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रमापेक्षा त्यांच्या स्वीकृत विषयाला विशेषत्वाने संपन्न करणारा अभ्यासक्रम त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल या भूमिकेतून प्राधान्याने वाणिज्य आणि इतर सर्वच विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशा व्यवस्थापनसूत्राणि ! या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या अभ्यासक्रमात महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी फ्रेंच विचारवंत हेन्री फेओल यांनी स्थापित केलेल्या व्यवस्थापनाच्या चौदा सूत्रांवर १७७ संस्कृत श्लोकांची रचना केली आहे. सोबतच या सर्व श्लोकांचा मराठी भाषेत अर्थ दिला असून प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी त्यांचा इंग्रजी अनुवाद केला असल्याने हे त्रिभाषिक पुस्तक सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त झाले आहे .
कार्य विभाजन, अनुशासन, क्रमबद्धता,समानता, स्थैर्य, अधिकार आणि दायित्व, संघटन अशा व्यक्ती, समाज, संस्था आणि राष्ट्राच्या व्यवस्थापनातील १४ महत्वपूर्ण सूत्रांचे यात निरूपण असल्याने सगळ्यांनाच हा ग्रंथ उपयोगी आहे.
सिद्धांत जरी पाश्चात्य तत्ववेत्यांनी मांडलेला असला तरी वेद,उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत यातील संदर्भांच्या आधारे त्यांचे करण्यात आलेल्या निरूपणाने यात भारतीय ज्ञानपद्धतीचा एक वस्तुपाठ साकारलेला आहे.
आज विद्यापीठात माननीय कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या हस्ते विमोचन होत असताना प्रकुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ.अविनाश असनारे, परीक्षा नियंत्रक डॉ . नितीन कोळी, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ दिनेश निचित, मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.मोनाताई चिमोटे , व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळ डॉ. अरुणा वाडेकर, वाणिज्य अभ्यासक्रम मंडळ अध्यक्ष डॉ. संग्राम रघुवंशी, लेखाकर्म अभ्यासक्रम मंडळ अध्यक्ष डॉ.जयंत गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते.