रघुवंशम् महाकाव्याच्या तृतीय सर्गाचे संस्कृत दिनी प्रकाशन.
महाकवी कालिदास विरचित रघुवंशम्
सुरेन्द्र इखारे वणी – महाकवी कालिदास विरचित रघुवंशम् महाकाव्याच्या निरूपण स्वरूपात संकल्पित 19 ग्रंथांच्या मालिकेतील तृतीय सर्गाचे दिनांक 19 ऑगस्ट 2024 ला संस्कृत दिनाच्या पर्वावर डॉ स्वानंद गजानन पुंड यांचे 77 वे प्रकाशन संपन्न होत आहे.
ज्या महान विभूतीमत्वाच्या अतिदिव्य जीवनकार्यामुळे या संपूर्ण वंशाला रघुवंश हे नाव प्राप्त झाले त्या महाराज रघुंच्या जीवनचरित्राचा आरंभीचा भाग हा या सर्गाचा विषय.
भगवान वशिष्ठांच्या मार्गदर्शनात देवी नंदिनी च्या कृपेने महाराणी सुदक्षिणा गर्भवती राहिली येथून या सर्गाला आरंभ होतो. तिच्या गर्भावस्थेचे, डोहाळ्यांचे सुरुवातीला जे मनोज्ञ वर्णन महाकवींनी साकारले आहे ते खरोखरच रोमहर्षक आहे.
त्यानंतर रघुंचा प्रत्यक्ष जन्म. त्याने राजापासून प्रजेपर्यंत सर्वांना झालेला अपूर्व आनंद. रघुंच्या बाललीला ही प्रत्येक गोष्ट रघुंच्या बाल्यावस्थेतील शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वृद्धिंगत वयाप्रमाणेच आनंद देणारी.
रघु चे तारुण्यातील पदार्पण वर्णन करताना महाकवींच्या प्रतिभेला जी वेगळीच चमक प्राप्त झाली आहे ती प्रत्यक्ष अनुभवण्याचाच विषय.
पुत्र तोच जो पित्याच्या आनंदाची आणि कार्याची अखंड वृद्धी करेल. या निकषावर रघुंच्या वैभवशाली युवराज्यत्वाचे रसग्रहण हा खऱ्या अर्थाने या सर्गाचा प्रतिपाद्य विषय.
पित्याद्वारे आरंभ केलेल्या यज्ञ अर्थात पवित्र आणि शास्त्रशुद्धकार्याच्या संरक्षणाचे आणि संवर्धनाचे पुत्राचे जीवन कार्य रघुंनी कसे संपन्न केले ? ते महाकवींनी येथे वर्णन केले आहे.
आपल्या कार्यावर निष्ठा असली आणि त्याच्या सुयोग्यतेची अंतरंगी शाश्वती असली की व्यक्ती सामान्य माणसांशी सोडून द्या देवराज इंद्राशी देखील लढायला कमी करत नाही, हा अद्वितीय सिद्धांत महाकवी येथे विशेषत्वाने अधोरेखित करीत आहेत.
इंद्राने अश्व पळवल्यावर शांत राहणारे रघु , योग्य उपाय शोधण्यासाठी देवी नंदिनीचे स्मरण करणारे रघु , इंद्राच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर दे त्याला निरुत्तर करणारे बुद्धिमतां वरिष्ठम् रघु , इंद्राच्या प्रत्येक शस्त्रास्त्रवर्षावाला निष्फळ ठरवणारे रघु , वज्राचा देखील आघात सहन करणारे अनुपमय रघु , बुद्धिवैभवाने पित्याला यज्ञ पूर्ण न होता देखील यज्ञाचे फळ प्राप्त करून देणारे रघु , अशा या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंना साकारणारा हा सर्ग आणि त्याचे हे निरूपण आपणा सर्व संस्कृत प्रेमी जणांना आनंद देईल यात शंकाच नाही.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभाग प्रमुख स्वरूपात कार्यरत विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांच्या लेखणीतून साकारलेल्या या ग्रंथाचा सर्व संस्कृत प्रेमींनी आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रकाशक अविरत प्रकाशन जळगाव (+91 90288 68953 ) यांच्याद्वारे करण्यात येत आहे.