विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे सरसावले
पोलीस विभागाला विद्यार्थिनींच्या सुरक्षेची केली मागणी
सुरेंद्र इखारे वणी : नुकतेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी नगर शाखेने शहरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्यावर आवाज उठवला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे. याच संदर्भात वणी शहर पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यात आले आहे.
विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार, विद्यार्थिनींना 24 तास सुरक्षा प्रदान करण्यासाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे पथक नियुक्त करावे. तसेच, वणी शहरातील सर्व शैक्षणिक परिसरात या पथकांची पेट्रोलिंग वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदन सादरीकरणाच्या प्रसंगी वणी नगरमंत्री विनय पुराणकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या सोबत इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचे परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
पोलिस प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी वैभव वाघमारे तथा विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.