वणी विधानसभा क्षेत्रात इच्छूकांचे गुडघ्याला बाशिंग!
सुरेंद्र इखारे वणी :- महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आता थोड्या दिवसावर आली आहे . त्यामुळे वणी ,मारेगाव व झरी या विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे व संघटनांचे नेते ,कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम वणी विधानसभा क्षेत्रावर झाल्याने अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्याने हे सर्वच नेते आपापल्यापरीने वणी,मारेगाव व झरी या तालुक्यात तळागाळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष व संघटनांचे माध्यमातून विविध कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. आपला पक्ष असो की संघटना असो तो कसा श्रेष्ठ हे दाखविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मतदार नागरिकांना आपले विचार पटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष असल्याने निवडणुकीच्या काळात कोणाची युती होईल हे काही सांगता येणार नाही. आज रोजी विविध पक्षातील इच्छूक उमेदवार उमेद लावून वणी विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रमाचे माध्यमातून आपण कसे सरस हे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालला आहे. परंतु या आगामी निवडणुकीत संधी मिळेल ही बाब सध्यातरी अधांतरीत आहे.
महाराष्ट्रच्या राजकारणात अनेक उलथापालथ झाल्याने पुढील परिस्थिती काय राहील याबाबत इच्छूक नेते व कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे . परंतु पक्षाची बांधिलकी असल्याने जो तो स्वतंत्र भूमिकेतून पक्षाचे प्रचाराचे दिसेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात सध्यातरी भाजप व शिंदे गट व महाविकास आघाडीत सर्व पक्ष अशा दोन पक्षांच्या लढतीमध्ये या दोन्ही पक्षातील बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याचा भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात आपापल्या पक्षाची ताकद दाखविण्यास सुरुवात झाली आहे . या निवडणुकीत अनेक इच्छूक नेते व कार्यकर्त्यांच्या नावांची चर्चा आहे. जसे भाजपचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, समाजसेवक विजय चोरडिया, शिंदे गटाचे विनोद मोहितकर,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात संजय देरकर, विश्वास नांदेकर, संजय निखाडे, काँग्रेस पक्षाचे संजय खाडे , अरुनाताई खंडाळकर, आशिष खुलसंगे, प्रा टिकाराम कोगरे, राजू कासावार, तर किरणताई देरकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात आहे.परंतु वणी विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यप्रणालीवर वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मतदार समाधानी असल्याचे मतदारातून बोलल्या जात आहे. परंतु पुढे चालून राजकीय समीकरण बदलल्यास नेमके काय होईल याबाबत येणारा काळच सांगेल . सध्यातरी सर्वच इच्छूक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे.