पोळा , बैलपोळा , तान्हापोळा व बडगा चा मतितार्थ – शब्दांकन ; रघुनाथ कांडरकर
———————————————
सुरेन्द्र इखारे वणी :- आज पोळा हा सण आहे . कृषी हा भारताचा प्रमुख व्यवसाय , कृषी व कृषी पूरक व्यवसायावर साधारणतः 67% भारतीय समाजाची उपजीविका अवलंबून आहेत . त्यामुळेच भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. कृषिला भारतात अनन्यसाधारण महत्व आहेत . आणि हा संपूर्ण व्यवसाय ज्यांच्या श्रमामुळे चालतो ते म्हणजे बैल ! आता आधुनिकीकरणाला सुरुवात झाली असली तरी अनेक कामे बैलाशिवाय होऊ शकत नाही . ज्यांच्या श्रमामुळे , प्रामाणिक पणामुळे घरात धनधान्य संपन्नता व वैभव प्राप्त होते , ज्यांच्या मेहनतीमुळे 140 कोटी जनता दोन वेळचे जेवण मिळते त्या बैलाचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा होय ! कोणतही धार्मिक संदर्भ नसलेला कृषक समाजाचा बैलाप्रति प्रेम , जिव्हाळा ,आपुलकी व माणुसकी दाखविणारा हा सण ! भारतीय व्यक्ती अत्यंत संवेदनशील आहे . तो पाळीव प्राण्याचे आपल्या जीवनातील महत्व भटक्या अवस्थेपासून आजपावेतो जाणून आहे व सांभाळत आहेत . बैल , गाई , म्हशी , कुत्रा , घोडा ,उंट , हत्ती , शेळी ,मेंढी यांचे आपल्या जीवनात किती महत्व आहे व किती आवश्यकता हे तो जाणून आहे व त्यांच्याप्रती कृतज्ञ आहेत .
आज पोळ्यानिमित्त व्हॉट्सअप , फेसबुकवर विविध पोस्ट , शुभेच्छापर पोस्ट पहिल्या . त्यामध्ये जवळपास सर्वच पोस्ट , व मागील अनेक वर्षांपासून मी ” बैलपोळा ” हा उल्लेख असलेला आढळून येतो . साधारणतः स्मार्ट फोन व व्हॉटसअप , फेसबुक येण्याचे अगोदर फक्त पोळा म्हटला जात असे , परंतु आता सर्रास बैलपोळा म्हटल्या जाते . खरंतर बैलांना एकत्रित करून भरविल्या जातो तो ” पोळा “! बैला व्यतिरिक्त कोणत्याही प्राण्यांच्या एकत्रित करण्याला पोळा म्हटले जात नाही . केवळ बैलांचा सण म्हणजे पोळा . त्यामुळे बैलपोळा म्हणण्याची काहीच गरज नाही . बैला व्यतिरिक्त इतर प्राणी एकत्रित करून सण भारतात कुठेही साजरे केले तरी त्याला पोळा म्हणत नाही . फक्त संयोगाने मोटारसायकल जास्त प्रमाणात एकत्र आल्या , बसेस एकत्र आल्या , ट्रॅक्टर एकत्र आले तर अनेकजण पोळा भरला असे म्हणतात . परंतु सजीव प्राण्यांच्या बाबतीत केवळ ” गायी – म्हशीची दिवाळी , बैलाचा तो पोळा ” ! असेच म्हटले जातात .अनेक राज्यात ह्या सणाला पोंगल , पेंगल व इतर विविध नावे आहेत .
पोळ्याचा पहिला दिवस तो म्हणजे ” वाढबैल “! घरोघरी मातीचे बैल तयार करून सायंकाळी त्याची मनोभावे पूजा केली जातात . त्याच बरोबर त्याच सायंकाळी बैलाचे हळद लावून खांद शेकले जातात . ग्रामीण परंपरेनुसार “आज आवतन घे उद्या जेवाले ये ” अशी आळवणी केली जातात . मुख्य पोळ्याचे दिवशी दारावर पळसाचे झाडाचे मेळे व मुरूम ठेवला जातो . ही प्राचीन काळातील प्रथा असल्यामुळे सणउत्सवाचा दिवस असल्यामुळे वातावरण निर्मितीसाठी ते लावले जात असावे . ( परंतु त्यामुळे पळस वृक्षाची बरीच तोड होत आहे ) सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना झूल टाकून , रंगीबेरंगी बेगड , मटाट्या , फुगे , चवर , बेलपत्री लावून , सजवून पोळा भरतात त्या ठिकाणी नेले जातात . पोळा सुटल्यांनातर मारोतीच्या देवळात नेऊन त्याची पूजा केली जाते , घरी पूजा केली जातात , नैवद्य दिला जातो , व बैलाप्रति आपुलकी , कृतज्ञता व्यक्त केली जातात . तिसरा दिवस म्हणजे बडगा ! वाढबैल , पोळा व बडगा ह्या तीन एकत्रित दिवसांचा सण म्हणजे पोळा सण ! ह्याच दिवशी तान्हा पोळा सुद्धा भरविला जातो . आता सर्वत्र तान्हा पोळा ह्याच नावाने प्रचलित आहेत . हळूहळू बडगा हा शब्द लुप्त होत चालला आहेत . ह्या महिन्यात पावसाळा ऋतु असतो त्यामुळे विविध जीवाणू , विषाणू , डास ,मच्छर ह्यांची उत्पत्ती होत असल्यामुळे मांस , मटण , मच्छी खाणे वर्ज्य असतात . विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढतो तो ” मारबत ” नावाच्या देवतेला साकडं घालून आराधना करून ह्या रोगराई , माश्या , मुरकुटे घेऊन जाणेबाबत किंवा नष्ट करणेबाबत आवाहन केले जातात . बडगा म्हणजे प्रतिकार , कारवाई , विरोध ! हळूहळू हा शब्द मराठी साहित्यात प्रचलित झाला आहे . कार्यालयीन भाषेत ” कारवाईचा बडगा ” असा शब्द रूढ झाला आहे तर ग्रामीण साहित्यात एखाद्याला पळवून लावणे , त्याचा प्रतिकार करणे म्हणजे ” त्याचा बडगा खेजला ” असा वाक्प्रचार रूढार्थाने वापरला जातो . आपण सर्व सर्व शेतकरी , शेतकऱ्यांची मुले त्यामुळे कृषक , शेतकी समुदाय व बैल यांचे कामाप्रति आपुलकी , कृतज्ञता व सदभावना व्यक्त करण्याचा सण सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करू या !