भगवंताच्या चरण कमलाचे सुख अवर्णनीय – ह. भ. प. शामबुवा धुमकेकर
सुरेंद्र इखारे वणी :- “भगवंताचे सर्वच अवयव नितांत सुंदर आहेतच. पण पाहायलाच गेले तर केसांमध्ये काळेपणा, कुटिलता हे दोष आहेत. मस्तक त्या केसांना धारण करते. कानात छिद्र आहेत. हृदयावर भृगुवत्सलांछन आहे. पण भगवंताच्या चरणकमला मध्ये कोणताच दोष नाही. त्यामुळे संत भगवंताच्या चरण कमलाचे चिंतन करतात.” असे विचार नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शाम बुवा धुमकेकर यांनी व्यक्त केले.
वणी येथील जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्र उत्सवात दुसऱ्या दिवशी ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या ” तुझे चरणी सुख अनुपम्य आहे ! ” या अभंगावर कीर्तन सेवा सादर करीत होते.
देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी प्रास्ताविकात देवस्थानचे उपक्रम तथा कीर्तनकारांचा परिचय करून दिल्यावर श्री शाम बुवा धुमकेकर यांनी भगवंताच्या चरण कमलाचे महत्त्व विशद केले. ज्या चरणाच्या स्पर्शाने अहिल्याशिळा उद्धरली ते किती अलौकिक असतील असे म्हणत विविधदृष्टांतांच्या आधारे चरण कमलांचे वर्णन केले.
मध्यंतरात श्री अरुण दिवे यांनी “जय दुर्गे दुर्गति परिहारिणी ” हे गीत सादर केले.
श्री नामदेवराव पारखी यांनी कीर्तनकारांचा सन्मान केला.
उत्तर रंगात देवी दाक्षायिणी तथा भगवान शंकरांची कथा आणि रामवरदायिनी तुळजाभवानीच्या निर्मितीची कथा सांगत भगवान श्री शंकर देखील श्री राम चरणाची आराधना करतात हे त्यांनी अधोरेखित केले.
कीर्तन सेवेला श्री अरुण दिवे यांनी संवादिनीवर तर श्री अभिलाष राजुरकर यांनी तबल्यावर साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले.