लोकमान्य टिळक महाविद्यालयात डॉ. पोलशेट्टीवार यांचा हृद्य सन्मान.
सुरेंद्र इखारे वणी :- शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, टाटा संशोधन संस्थेचे संशोधक डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, यांच्या हस्ते भारतीय वैज्ञानिक क्षेत्रात सर्वोच्च मानला गेलेला डॉ. शांतीस्वरूप भटनागर युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयात त्यांचा हृद्य सत्कार संपन्न झाला.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्यात व्यासपीठावर वणी विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक नरेंद्र ठाकरे, उमापती कुचनकार, नरेश मुणोत, अनिल जयस्वाल, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी, आश्चर्यचकित करणारे कार्य आणि विस्मयचकित करणारा विनय यांचा सुंदर संगम असणाऱ्या डॉ पोलशेट्टीवार यांचा कार्याचा आलेख म्हणजे लहान गावातून देखील किती मोठी झेप घेता येते ? याचा वस्तुपाठ आहे असे मत व्यक्त केले .
उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया यांनी, चिंता नव्हे तर चिंतन करून त्याचे अनुसरण व्हायला हवे. केवळ मार्ग पाहून उपयोग नाही तर त्यावर मार्गक्रमण करायला हवे असे म्हणत आपल्या प्रेरणेतून अनेक ” विवेक” निर्माण होतील असा आशावाद प्रगट केला.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी डॉ .पोलशेट्टीवार सोबतच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत “आपल्या माणसाच्या” यशाच्या अभिमानाचा विशेषत्वाने उल्लेख केला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे हे यश संस्थेसाठी अत्यंत गौरवाचा विषय आहे हे सांगत विजय मुकेवार यांनी डॉ पोलशेट्टीवार यांना शुभकामना देत विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा अस्वले यांनी परिचय करून दिल्यानंतर डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांनी आपली संशोधन संस्था, तेथे चालणारी कार्ये, ज्या संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला त्याचे स्वरूप, ग्लोबल वार्मिंग या अत्यंत भयानक प्रश्नावर या संशोधनातून मिळणारे कायमस्वरूपी उत्तर,इतर संशोधन प्रकल्प याबद्दल उपस्थितांना साध्या, सोप्या, सहज समजेल अशा भाषेत आपल्या कार्याचे वैशिष्ट्य विशद करीत प्राध्यापक तथा विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान देखील सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ अजय राजूरकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.