अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर एकाच महाविद्यालयाच्या सहा प्राध्यापकांची निवड.
वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा गौरव
सुरेंद्र इखारे वणी – विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर सदस्य म्हणून कोणत्याही महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची नेमणूक होणे किंवा निवडून येणे ही अत्यंत गौरवाची बाब मानली जाते.मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रम मंडळाच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आणि नुकत्याच झालेल्या नेमणुकींमध्ये एकाच महाविद्यालयातील तब्बल सहा प्राध्यापकांची विविध विषयाच्या अभ्यासक्रम मंडळावर निवड झाल्याने वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अभूतपूर्व उपलब्धी आहे.
वणीच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सहा प्राध्यापकांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर सदस्य म्हणून निवड झालेले तालुक्यातील एकमेव महाविद्यालय आहे .यामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे ( वाणिज्य – व्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रम मंडळ ) तथा डॉ. अभिजित अणे ( विज्ञान भाषा अभ्यासक्रम मंडळ) हे दोन्ही सदस्य आपापल्या मंडळात सलग दुसऱ्या वेळा निवडून आले असून दोघेही आपापल्या मंडळाच्या द्वारे विद्या मंडळावर निवडून गेले आहेत तर प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड ( संस्कृत अभ्यासक्रम मंडळ ) सलग तिसऱ्या वेळा अविरोध निवडून आले असून संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत हे विशेष उल्लेखनीय.
अभ्यासक्रम मंडळावर स्वीकृत सदस्य स्वरूपात डॉ. अजय देशपांडे ( मराठी अभ्यासक्रम मंडळ.) डॉ. होमराज पटेलपैक ( संगणकशास्त्र अभ्यासक्रम मंडळ) आणि डॉ. मनोज जंत्रे ( वाणिज्य – व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम मंडळ ) या तिघांची निवड झाल्यामुळे लोकमान्य टिळक महाविद्यालयाने हा आगळावेगळा षटकार साकारला आहे.
अमरावती विद्यापीठातील अत्यंत सुदूर असणाऱ्या आदिवासी बहुल भागातील लोकमान्य टिळक महाविद्यालयास प्राप्त झालेल्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश बोहरा, सचिव ॲड. लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के यांच्यासह सर्व संचालक मंडळ, संस्थेचे आजीव सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि वणीतील विविध गणमान्य नागरिकांच्या द्वारे या सर्व सदस्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.