डॉ स्वानंद पुंड निरूपित”श्री दत्तात्रेय यदु संवाद ” वर अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रम.
सुरेंद्र इखारे वणी :- श्रीमद् भागवत महापुराणाच्या एकादश स्कंदात आलेला एक नितांत रमणीय संवाद म्हणजे श्री अवधूत अर्थात श्री दत्तात्रेय यदू संवाद. श्री दत्तात्रेयांनी केलेल्या २४ गुरूंचे आणि त्यांच्यापासून प्राप्त केलेल्या विविध गुणांचे यात अत्यंत मनोवेधक आणि अनुकरणीय स्वरूपात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.
या सर्व गुरूंची सूची पाहिल्यानंतर लक्षात येते की पारंपारिक स्वरूपात आपण ज्यांना गुरु किंवा आचार्य म्हणतो त्यापैकी यात कोणीही नाही. मोजके तीन-चार सोडले तर कोणी मानव देखील नाही. निसर्गातील तत्त्वे, पशु ,पक्षी यांनाच या सूचीत प्राधान्य आहे. पण मग प्रश्न निर्माण होतो की या सर्व गोष्टी शिकवणार कशा? तर त्यावर दत्तात्रेय महाराज म्हणतात ते वाक्य फार महत्त्वाचे आहे. ते म्हणतात यांच्याकडून ,”मी हे हे शिकलो.”
येथे “शिकवणे ” नाही तर ” शिकणे ” आहे. त्यामुळेच, “भारतीय स्वयं शिक्षा पद्धती!” या स्वरूपात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळांने या विषयावर सादर केलेल्या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने मान्यता प्रदान केली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या अनेक नवीन गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सामान्य मुक्त निवड अभ्यासक्रम ( जी.ओ.ई.सी. ) स्वरूपामध्ये संस्कृत अभ्यासक्रम मंडळाद्वारे मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी आलेखित केलेला हा अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
प्राचीन संस्कृत साहित्याचे सुबोध मराठीत रसग्रहण करणारे सर्वप्रथम आणि एकमेव यूट्यूब चैनल गीर्वाणवाणी या जगभरातील संस्कृत प्रेमींच्या आवडत्या चैनल वर १४ डिसेंबर पासून या विषयावर व्हिडिओ मालिका प्रसारित होणार आहे ते देखील विशेष उल्लेखनीय.
दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर समस्त दत्तभक्तांनी संस्कृती प्रेमी जणांनी आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांनी देखील या सुवर्णसंधीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन या विषयाला पुस्तक रूपात प्रकाशित करणाऱ्या जळगाव येथील अविरत प्रकाशनाद्वारे करण्यात येत आहे.