*मीना काशीकर ‘ सावित्रीची लेक ‘ पुरस्काराने सन्मानित*
सुरेंद्र इखारे वणी:-
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिषद शाळा क्रमांक 5 च्या प्रभारी मुख्याध्यापिका मीना गजानन काशीकर यांना सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक आठ तर्फे सावित्रीबाईंच्या जयंती निमित्त ‘ सावित्रीची लेक’ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राणानुर सिद्दिकी या होत्या. पुरस्कार वितरक म्हणून वणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी जयंत सोनटक्के, प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार , स्वच्छ भारत अभियानाचे शहर समन्वयक मयूर मूंदाने, मनीषा शिवरकर, माजी मुख्याध्यापक बंडू कांबळे, अविनाश पालवे, रवी आत्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करून मुलींसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या महिलांना यावर्षीपासून सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक आठ चे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला त्या अनुषंगाने आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये महिला व मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेऊन एक आदर्श निर्माण करणाऱ्या नगरपालिकेतील शाळा क्रमांक पाचच्या प्रभारी मुख्याध्यापिका मीना काशीकर यांची यावर्षी या पहिल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मीना काशीकर या नगरपालिकेमध्ये मागील 32 वर्षापासून कार्यरत आहेत या काळात त्यांनी नगरपालिकेतील मुलींच्या शिक्षणासाठी विशेष परिश्रम करून त्यांच्यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुद्धा राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना राणानुर सिद्दिकी व पुरस्कार वितरक डॉ. सचिन गाडे यांनी काशीकर यांच्या कार्याचा गौरव करून योग्य व्यक्तीला सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला त्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथीनी सुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जगताप यांनी केले. आभार प्रदर्शन निलिमा राऊत यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता जकाते, देवेंद्र खरवडे, अविनाश तुंबडे यांनी परिश्रम घेतले.