वणी येथील ठाकरे आणि खरवडे सरांचे सुयश
सुरेंद्र इखारे वणी :- नगर परिषदेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना सुयोग्य व्यासपीठ प्राप्त व्हावे यासाठी नगर परिषदेच्या नगर विकास विभागाद्वारे प्रतिवर्षी आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात वणी येथील नगरपरिषद शाळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न.प. शाळा क्रमांक सात चे शिक्षक दिगंबर सुरेश ठाकरे तथा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले न.प. शाळा क्र. आठ चे शिक्षक देवेंद्र सुधाकर खरवडे यांना युगलगीत स्वरूपात सादर केलेल्या साथी या चित्रपटातील याराना यार का….या गीतासाठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
त्याचप्रमाणे दिगंबर सुरेश ठाकरे यांना आजकाल याद कुछ…. या नगीना चित्रपटातील गीतासाठी व्यक्तिगत श्रेणीत देखील प्रथम क्रमांक प्राप्त झाला हे विशेष उल्लेखनीय.
पांढरकवडा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत वणी येथील या दोन्ही शिक्षकांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल, अतुल पंत मुख्याधिकारी दिग्रस, विठ्ठल केदारे मुख्याधिकारी दारव्हा, सचिन गाडे मुख्याधिकारी वणी, जयंत सोनटक्के उपमुख्याधिकारी वणी, ज्ञानेश सोनोणे मुख्याधिकारी पांढरकवडा, श्री मॅकलवार प्रशासन अधिकारी नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यापुढे विभागीय स्तरावर आयोजित महोत्सवात हे उभयता यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या दोन्ही मित्रांच्या यशाबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभकामना प्रदान करण्यात येत आहे.