भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी तारा लाला लजपत राय
सुरेंद्र इखारे वणी :- भारतीय स्वातंत्र्याची चळवळ बहुविध अंगांनी लढल्या गेली होती. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देण्यात आलेला पहिला हुंकार म्हणजे 1857 चा उठाव. त्यानंतर मवाळवादी नेत्यांनी केलेले प्रयत्न. जहालवादी व क्रांतीकारकांची भूमिका. आणि शेवटी 1920 ते 1947 चा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. लोकमान्य टिळक हे जहालवादी विचारसरणीचे होते. त्यांच्याबरोबरच लाला लजपतराय हे सुद्धा एक जहाल मतवादी विचाराचे होते. लाला लजपतराय यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पंजाबमध्ये फार मोठे आंदोलन उभे केले होते म्हणूनच त्यांना पंजाब केसरी असे म्हटले जाते. 1928 मध्ये भारतात आलेल्या सायमन कमिशन विरुद्ध त्यांनी मोर्चा उभारला होता. त्या मोर्चामध्ये लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी प्रचंड लाठीमार केला होता त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या महान देशभक्ताला श्रद्धांजली देण्यासाठी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे इतिहास विभागाकडून लाला लजपतराय यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अनिल आडसरे सर उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी लाला लजपत राय यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देतानाच त्यांनी त्यांच्या आर्थिक कार्याबद्दल सुद्धा माहिती दिली व पंजाब नॅशनल बँकेचे ते संस्थापक असल्याचे सुद्धा सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ गजानन सोडणर उपस्थित होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा विविध अंगांनी इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीमधील लाला लजपत राय यांचे योगदान स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रवीण पोटे सर यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.